गोमंतक हिंदू प्रतिष्ठानच्या पणजी येथील पत्रकार परिषदेत घोषणा !
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला (केरळ) मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात केरळ येथील महिला आणि धर्माभिमानी नागरिक यांनी लढा उभारला आहे. हिंदूंच्या परंपरांच्या रक्षणार्थ उभारलेल्या या लढ्याला गोमंतकातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा रहाणार आहे. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आझाद मैदान, पणजी येथे १३ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता धरणे आंदोलन करणार आहेत, तसेच मंदिरातील प्रवेशाला विरोध करण्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोवा नायर संघटनेच्या वतीने मांगोरहील, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरात १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या काळात नामजप उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाला गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा आहे, अशी माहिती गोमंतक हिंदू प्रतिष्ठानचे श्री. शैलेंद्र वेलींगकर यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला गोवा नायर संघटनेचे के.आर्.एस्. नायर, विशाल गोमंतक सेनेचे श्री. सुरेश आरोंदेकर, शिवयोद्धा संघटनेचे श्री. माधव विर्डीकर, भारत माता की जय संघटनेचे सुरेश डिचोलकर, भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेस उपस्थित मान्यवरांनी शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश दिल्याच्या निर्णयाच्या विरोधात यशस्वीरित्या उभारलेल्या आंदोलनाची प्रशंसा केली. तसेच गोमंतकातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु परंपरेच्या रक्षणासाठी अशाच प्रकारे एकजूट दाखवणे आवश्यक आहे, असे सांगितले.