सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची पोखरा, नेपाळ येथील विंद्यवासिनी मंदिराचे प्रमुख श्री निष्णानंद महाराज यांच्याशी भेट !
पोखरा (नेपाळ) : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील विंद्यवासिनी मंदिराचे प्रमुख श्री निष्णानंद महाराज यांची २५ ऑक्टोबर या दिवशी सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी महाराजांना सनातन आश्रमात होत असलेले आध्यात्मिक संशोधन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांविषयी सविस्तर माहिती दिली. यावर महाराजांनी सनातन आश्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्यही श्री निष्णानंद महाराज यांनी जाणून घेतले. त्यांनी पश्चिम नेपाळ येथील त्यांच्या आश्रमाचा वापर धर्मकार्यासाठी तुम्ही करू शकता, असे सांगितले आणि कार्यासाठी आशीर्वाद दिला. पुन्हा पोखरा येथे येणार असल्यास कार्यक्रमाचे आयोजन करतो, असेही त्यांनी सांगितले. श्री निष्णानंद महाराज यांनी स्वत:हून स्वामी बोधानंद यांच्याशी चर्चा करून सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी भेट घडवून आणली.
बुटवल येथील धर्मप्रेमींशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची हिंदूंवरील आघात आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांवर चर्चा !
बुटवल (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट देणारे श्री. जीवन खनाल यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे नेपाळ येथे येत असल्याचे समजल्यावर त्यांनी त्यांच्या मित्रांसह सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची येथे भेट घेतली. या वेळी श्री. खनाल यांनी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात आणि तीव्र गतीने होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी चिंता व्यक्त केली आणि धर्मांतर करणार्यांना वैध मार्गाने कसे रोखू शकतो, या विषयी जाणून घेतले.
या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे मार्गदर्शन करतांना म्हणाले, भ्रष्टाचार सरकारमान्य नसतो, तरी सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असतो. त्याप्रमाणेच हिंदु धर्मात स्पृश्य-अस्पृश्य असे काही नाही, शास्त्रातही असे कुठे लिहिलेले नाही. धर्मात नेमके काय आहे, हे समजण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणेे आणि धर्माचरण करणे महत्त्वाचे आहे. रामाने अवतार घेण्याच्या अगोदर रामायण लिहिले गेले, कृष्णजन्मापूर्वीच कंसवधाची आकाशवाणी झाली होती. हिंदु धर्मात पुढे काय होणार, हे आधीच सांगितले जाते; मात्र इतिहास हा नंतर लिहिला जातो. जिंकणारा स्वत:ला हवा तसा इतिहास लिहितो.
बुटवलमधील मानव धर्म सेवा समितीच्या कार्यकर्त्यांशी झालेली भेट
बुटवलमधील मानव धर्म सेवा समितीचे श्री. कविंद्र श्रेष्ठ यांनी त्यांच्या युवा कार्यकर्त्यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची भेट घडवली. या वेळी श्री. श्रेष्ठ यांनी नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू ? असे विचारले असता याविषयी मार्गदर्शन करतांना सदगुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, हिंदुत्वाचे कार्य परिणामकारक होण्यासाठी धर्म जाणणे आवश्यक आहे. धर्म जाणला, तर हिंदु राष्ट्र म्हणजे काय हे समजेल. त्यासाठी धर्मशिक्षण घेणेे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. निरंतर धर्माचे विचार प्रसारित करणे, हिंदूंचे संघटन करणे, आदर्श ध्येय घेऊन प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. प्रलोभने दाखवून केल्या जाणार्या धर्मांतराला सरकारही उत्तरदायी आहे; कारण जनतेला सुविधा देणे हे सरकारचे कार्य आहे. सरकारने हिंदूंना सुविधाच उपलब्ध करून न दिल्याने ते प्रलोभनांना बळी पडतात. या वेळी श्री. कविंद्र यांनी पुढील वेळी आम्ही सर्व युवकांना एकत्र करतो, तुम्ही पूर्ण दिवस आम्हाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली.
हिंदु राष्ट्रातच तीर्थक्षेत्रांना ऊर्जितावस्थेत प्राप्त होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
पाल्या येथील काली गंडकी ज्ञान विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दामोदर मास उत्सवात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन
पाल्पा (नेपाळ) : येथील काली गंडकी ज्ञान विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चैतन्य कृष्ण यांनी दामोदर मासात प्रथमच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन सामूहिकरित्या दामोदर मास उत्सव साजरा करण्याचे ठरवले होते. याचा शुभारंभ २४ ऑक्टोबर या दिवशी तेथील पवित्र अशा उत्तर वाहिनी काली गंडकी नदीच्या तिरावर झाला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,
१. वर्तमानात धर्मसंस्थापनेसाठी अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे हीच गंडकी माता, भगवान हिमालय आणि ईश्वर यांची आज्ञा असल्याने सर्वांनी या कार्यात कृतीशील व्हायला हवे; कारण हिंदु राष्ट्रच तीर्थक्षेत्रांना ऊर्जितावस्थेत प्राप्त करून देऊ शकते.
२. महोत्सव म्हणजे महाउत्सव. आध्यात्मिकदृष्ट्या साधनेत आपण व्यापक होत जातो आणि महत्तत्त्वाशी एकरूप होतो. येथील गंडकी नदीचा प्रवाह उत्तर दिशेला आहे. माता गंडकी पंच तत्त्वांपैकी एक आहे, जी सगुण उपासनेच्या माध्यमातून देवाजवळ नेण्याचे एक माध्यम आहे.
३. धन २ प्रकारचे असते. एक व्यावहारिक धन आणि दुसरे गुरुकृपेचे धन. तसेच जागृतीही दोन प्रकारची असते. एक स्थुलातून होणे आणि दुसरे स्वस्वरूपाने जागृत होणे. जागरण म्हणजे स्वत:च्या ईश तत्त्वाला जागृत करणे होय. अशा जागृतीसाठी गुरुकृपेचे धनच उपयोगी आहे. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री स्वस्वरूपाने जागृत राहून महालक्ष्मीच्या चरणी आम्हाला गुरुकृपेचे धन आणि ईश्वरीकृपेचे धन प्राप्त होवो, अशी प्रार्थना करावी.
राष्ट्रीय धर्मसभा नेपाळच्या वतीने पंचम राष्ट्रीय पंडित संमेलनाचे आयोजन
राष्ट्राच्या उत्कर्षाचे समष्टी दायित्व ब्राह्मणांचे आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे,राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
काठमांडू : ब्राह्मण म्हणून आपण आपल्या कर्माची फलश्रुती यजमानांना किंवा स्वत:ला देऊ शकलो नाही, तर आपल्या ब्राह्मणत्वात, पांडित्यात काही तरी न्यूनता आहे, हे लक्षात घेऊन त्याचे चिंतन-मनन केले पाहिजे; कारण ब्राह्मणाला वैयक्तिक स्तरावर व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्म-कर्म दिले आहे आणि समष्टी स्तरावर राष्ट्राच्या उत्कर्षाचे दायित्वही दिले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. राष्ट्रीय धर्मसभा नेपाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचम राष्ट्रीय पंडित संमेलनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले की,
१. ब्राह्मण वर्ण चारही वर्णांचे प्रतिनिधित्व करतो. सर्व वर्णांची क्षमता त्याच्यामध्ये असते. जी व्यक्ती चारही वर्णांना सामावून घेत त्याच्याशी एकरूप होऊन विराट अशा समाजपुरुषाचे एक संघटित अंग निर्माण करू शकत नाही, त्याला ब्राह्मण म्हणता येईल का ? या प्रश्नावर चिंतन-मनन झाले पाहिजे.
२. समाजात धर्म आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांनी वावटळ निर्माण केले आहे. त्यामुळे धर्माची व्याख्या समजून घेतली पाहिजे. या संदर्भात समाजाला दिशा दिली नाही, तर याचे पाप आपल्याला लागू शकते ?
३. आद्य शंकराचार्यांनी धर्माची जी अंतिम परिपूर्ण व्याख्या केली, ती म्हणजे ज्यामुळे व्यक्तीची भौतिक आणि पारलौकिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते, तो धर्म. धर्माने प्रत्येक व्यक्तीने कोणाशी कसे आचरण करावे, हे सांगितले आहे, उदा. एखाद्या पुरुषाचे आचरण त्याची पत्नी, बहीण आणि आई यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे असते. तो त्यांच्याशी एकाच प्रकारचे आचरण करू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्व धर्म समान असल्यास समाजात अराजकता निर्माण होईल. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र कधीच धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही. आज सेक्युलॅरिजमचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा केला जातो, हे चुकीचे आहे. सेक्युलॅरिजमचा अर्थ पंथनिरपेक्षता असा आहे, हे समाजाला सांगण्याचे दायित्व आपले आहे. आज धर्मशासनाची आवश्यकता आहे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांपासून आपण धर्माला वेगळे करू शकत नाही.