बाजीराव-मस्तानी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग न वगळल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार – कपिल शर्मा
धुळे : बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला दिसत नाही. इतिहास काय असतो, हे त्यांना शिवसैनिक समजावतील, असे शिवसेनेचे श्री. कपिल शर्मा यांनी या वेळी सांगितले.
धुळे शहरातील धुळे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर, महाराणा प्रताप पुतळ्याजवळ १६ डिसेंबर या दिवशी विविध घोषणा देत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत निदर्शने करण्यात आली.
योग वेदांत सेवा समितीचे श्री. भावसार म्हणाले, स्वत:चा गल्ला भरण्यासाठी इतिहासाची मोडतोड करणे म्हणजे महान भारतीय संकृतीला धक्का लावणे आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. बागुल म्हणाले, इतर धर्मियांच्या तुष्टीकरणासाठी शासकीय निधीचा वापर न करता तेलंगण शासनाने नाताळ शासकीय स्तरावर साजरा करणे रहित करावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत. आंदोलनानंतर धुळे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी स्वदेशी जागरण मंचाचे श्री. विलास राजपूत, योग वेदांत सेवा समितीच्या वतीने श्री. मुकेश भावसार, डॉ. योगेश पाटील, सुवर्णकार समाजाचे सचिव श्री. विजय सोनार, वडजाई गावाचे श्री. राहुल चौगुले, बांधकाम संघटनेचे सर्वश्री समाधान मराठे, संतोष पाटील, सनातन संस्थेचे सर्वश्री भगवान चव्हाण, चेतन जगताप, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विजय उग्रेज, पंकज बागुल उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आंदोलन स्थळावर असलेल्या भाडेवाहू गाड्या हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन कळल्यावर त्वरित काढण्यात आल्या.
२. उप-जिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांनी समितीचे विषय नवीन आणि समाजाला दिशा देणारे असतात, असे सांगितले.
३. या आंदोलनाला स्थानिक केबल वाहिन्या आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी चांगली प्रसिद्धी दिली.
धुळे शहर पोलीस शाखेतील पोलीस म्हणाले, इतर संघटनांनी समितीकडून शिस्तबद्ध पद्धतीने कार्य कसे करायचे, हे शिकले पाहिजे. आम्हाला समितीकडून काहीही त्रास होत नाही म्हणून आम्ही समितीच्या आंदोलनाला कधीही अनुमती नाकारत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात