देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले अन् चिनी फटाके यांच्या अवैध विक्रीविषयी काटेकोर कायदेशीर प्रक्रिया राबवणार ! – देवेंद्र पोळ, चिपळूण पोलीस निरीक्षक
चिपळूण : येथील बाजारात दीपावली निमित्ताने देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले अन् चिनी फटाके यांच्या अवैध विक्रीविषयी कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाईल, याविषयी मी तुम्हाला आश्वस्त करतो, असे प्रतिपादन चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांशी व्यक्त केले.
फटाक्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, तसेच राष्ट्रपुरुषांच्या अपमानामुळे राष्ट्रीय अस्मितांचे हनन होत आहे. हे रोखण्यासाठी गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती वैध मार्गाने चळवळ राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून ३ नोव्हेंबर या दिवशी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले अन् चिनी फटाके यांच्या अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याविषयीचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हे निवेदन येथील तहसीलदार यांनाही देण्यात आले. हे निवेदन देते वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रणय वाडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे आणि डॉ. हेमंत चाळके उपस्थित होते.