चिनी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी
भाग्यनगर (तेलंगण) : दीपावलीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्या आणि स्वस्त दरात उपलब्ध असणार्या चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच चिनी आकाशकंदील आणि दीपमाळा यांच्यावरही बंदी घातली जावी, यासाठी येथील सिंकदराबाद रेल्वेस्थानक आणि बसस्थानक येथे ५ नोव्हेंबर या दिवशी जनजागृती अभियान राबवण्यात आले. अखंड भारत सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे राबवलेल्या या अभियानात देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके न उडवण्याविषयीही लोकांचे प्रबोधन केले.
धर्मप्रेमींनी हातात फलक धरून लोकांचे प्रबोधन केले. बाजारात उपलब्ध असणार्या फटाक्यांवर श्री लक्ष्मीदेवी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे असतात. हे फटाके उडवल्याने देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन होते, असे प्रबोधनाच्या वेळी सांगण्यात आले. या अभियानाला पोलीस आणि नागरिक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्रे
१. अखंड भारत सेनेने हे अभियान त्यांच्या ‘फेसबूक’द्वारे लाईव्ह केले होते.
२. या अभियानात महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी अर्धा घंटा हातात फलक धरून सहभागी झाल्या होत्या.
३. आजूबाजूने जाणार्या लोकांनी भ्रमणभाषवर अभियानाचे चित्रीकरण करून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवले.
४. एका पोलीस अधिकार्याने ‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. येथील एका देवालयाचे (यल्लमा) सरकारीकरण झाले आहे, तेथे महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय नाही. तुम्ही हा विषय हाती घ्या’, असे सांगितले.