काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे नेपाळ येथे गेले असतांना तेथे त्यांनी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी यांची भेट घेतली. या भेटींचा वृत्तांत येथे देत आहोत.
१. हिंदु जागरण नेपाळचे अध्यक्ष आणि श्रीमद् भागवत प्रचार-प्रसार संघाचे कथा व्यास पंडित रामकृष्ण उपाध्याय यांची भेट !
हिंदु जागरण नेपाळचे अध्यक्ष आणि श्रीमद् भागवत प्रचार-प्रसार संघाचे कथा व्यास (कथाकार) पंडित रामकृष्ण उपाध्याय यांची २९ ऑक्टोबर या दिवशी सदिच्छा भेट घेतली. या वेळी पंडित रामकृष्ण उपाध्याय यांनी नेपाळमध्ये नव्यानेच लागू झालेल्या धर्मांतरविरोधी कायद्याद्वारे धर्मांतर रोखण्याच्या संदर्भात ते करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगितले. पंडित उपाध्याय म्हणाले, ‘‘केवळ कायदा बनवून चालणार नाही, तर त्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारला आपणच बाध्य करायला हवे. धर्मांतर करणारेही आता सतर्क होउन धर्मांतर करू लागले आहेत. सध्या नेपाळमध्ये काही धार्मिक कृतींमध्ये मनानेच पालट केला जात आहे, उदाहरणार्थ व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे १३ दिवस केले जाणारे कर्म ५ दिवसांत करायला आरंभ केला आहे. शास्त्रांचा कोणताही आधार नसतांना पंडितांकडून असे पालट केले जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याला विरोध करण्यासाठी धर्मशास्त्राच्या काही अभ्यासू पंडितांच्या साहाय्याने या विधींच्या संदर्भातील सर्व संदर्भांचा एक ग्रंथ संकलित केला. १३ दिवसांचे कर्म ५ दिवसांत करणार्यांना आवाहन केले की, आधी या संदर्भांचे खंडण करावे आणि नंतरच असे कर्म करावे, अन्यथा अशा पंडितांचा बहिष्कार केला जाईल.’’
२. ३० ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे सदस्य आणि जय संगत आश्रमाचे संस्थापक श्री. पुष्पराज पुरुष यांच्या आश्रमाला भेट दिली. जरो किलो प्रतिष्ठानचे संस्थापक आणि ‘राष्ट्रराज्य’ ग्रंथाचे लेखक प्रा. निर्मलमणी अधिकारी यांचीही सदिच्छा भेट घेतली.
३. २ नोव्हेंबर या दिवशी जनकपूर येथील सुंदर सदनचे महंत श्री. नवलकिशोर शरण यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची जनकपूर नागरिक समाजाचे श्री. मुरली मनोहर मिश्र आणि डॉ. मुकेश झा यांच्याशी भेट घडवून आणली. या वेळी श्री. मिश्र यांनी सध्या नेपाळ येथील विविध लोकांनी हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत असल्याचे भासवून नंतर विश्वासघात केल्यामुळे लोक हिंदुत्वाचे कार्य करणार्यांवर विश्वास ठेवण्यास कचरत असल्याचे सांगितले. महंत श्री. नवल किशोर शरणज यांनी ‘केवळ विचार किंवा कृती करून चालणार नाही, तर हनुमंताप्रमाणे विचार आणि कृती दोन्ही करणे आवश्यक आहे’, असे सांगितले.
या संदर्भात सद्गुुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘समस्या सुस्पष्ट असणे, तिचे योग्य अध्ययन आणि निराकरणासाठी तिच्या मुळाशी जाऊन साधनेची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य. जेथे स्वार्थ, सत्ता, अधिकार आणि अहंकार आहे, तेथे रामराज्य नाही. त्याग करण्याची वृत्ती, प्रतिकूलता, स्वीकारण्याची वृत्ती, निःस्वार्थीपणा आहे, तेथे रामराज्य आहे. यासाठी गुणवंत समाज निर्माण करणे आवश्यक आहे.’’
४. बीरगंज, विश्व हिंदु महासंघाचे केंद्रीय सदस्य श्री. पृथ्वी झा आणि प्रा. जनार्दन प्रसाद चौधरी, श्री. विजय शर्मा आणि मरुण बिक्म सहा यांची ३ नोव्हेंबर या दिवशी भेट घेतली. श्री. पृथ्वी झा यांनी नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांना येणार्या अडचणी आणि अपयश यासंदर्भात चर्चा केली. याचे कारण स्पष्ट करतांना सद्गुुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, आज हिंदूंमध्ये धर्मचेतना जागृत नाही. त्यांच्याकडून बुद्धी आणि बाहुबल या स्तरावर कार्य होत आहे. अर्जुनाप्रमाणे भाव आणि भक्ती या स्तरावर जेव्हा कार्य होईल, तेव्हा परिणाम दिसू लागतील. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे.
५. बीरगंज येथील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणारे श्री. उमेश साह यांनी हिंदु परिषद नेपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष पटेल आणि परिषदेचे काही सदस्य यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी भेट घडवून आणली. या वेळी सर्वांनी समिती भारतात प्रभावीपणे करत असलेले हिंदूसंघटन, धर्मरक्षणाचे कार्य जाणून घेतले. हिंदूसंघटन करणार्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या विचारांचे खंडण करून प्रभावी अन् परिणामकारक कार्य करण्यासाठी प्रशिक्षित होण्याची आणि साधना करून धर्मचेतना जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी समिती कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेत असल्याचे सांगितले.
६. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी पशुपतिनाथ मंदिराचे मूळ भट श्री. गणेश रावल यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी रुद्राक्षाची माळ घालून शुभाशीर्वाद दिले.