व्यक्तीगत जीवनात आनंद आणि त्यागावर आधारित हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी साधनेचे बळ आवश्यक : मनोज खाडये
चिपळूण : व्यवहारिक जीवनात यशस्वी असणारी व्यक्ती त्याचे श्रेय स्वतःच्या कर्तृत्वाला देते; मात्र जीवनात दु:खद घटना घडल्यास ‘देवाने हे दुःख माझ्याच वाट्याला का दिले’, अशी अप्रसन्नता व्यक्त करते. ईश्वरी शक्तीच्या आधारेच मनुष्य स्वत:च्या जीवनात समाधानता प्राप्त करून घेऊ शकतो, बाकी व्यवहारिक प्राप्ती ही प्रारब्धाधीन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ४ पुरुषार्थांपैकी अर्थ आणि काम हे प्रारब्धाधीन आहेत, तर धर्म आणि मोक्ष प्राप्तीकरता क्रियमाणाची आवश्यकता असते; परंतु मनुष्य जीवनभर अर्थ आणि काम याचकरता क्रियमाण वापरतो अन् धर्म आणि मोक्ष प्रारब्धावर सोपवतो. खरे तर व्यक्तीगत जीवनात आनंद आणि त्यागावर आधारित हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी साधनेचे बळ आवश्यक आहे. यासाठी प्रत्यक हिंदूने साधना करण्याचा निर्धार केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी लवेल, ता खेड येथे आयोजित चर्चासत्रात उपस्थितांना केले.
श्री मालशे सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात असगणी येथील सर्वश्री चंद्रकांत गोसावी, अशोक बुरटे, लवेल शेलारवाडी येथील गोपाळ शेलार, अनंत शिंदे, सात्विणगाव येथील अनंत जोयशी, संदीप चांदीवडे, मेटे येथील जगन्नाथ कदम, चंद्रकांत पाटील, आष्टी येथील अमित गुरव, दाभिळ येथील श्रीमती संध्या गुणदेकर, सौ. सविता देसाई, मोरवंडे येथील सर्वश्री काशिनाथ भुवड, विजय भुवड आदी २३ धर्मप्रेमी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर मोरे, दत्ताराम घाग आणि विष्णु साळुंके यांनी सहभाग घेतला.