हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू : नेपाळमधील काठमांडू येथील उद्योजक श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या एका बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी संबोधित केले. या वेळी ते म्हणाले की, हिंदूंचा गौरवशाली इतिहास लपवून चुकीचा इतिहास जगासमोर मांडला जात आहे. त्यातून हिंदू कसे मागासलेले आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे. धर्मशास्त्राचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करून शास्त्राचे महत्त्व जगासमोर मांडण्याचा हिंदु जनजागृती समितीचा प्रयत्न आहे. नामजपाच्या चैतन्याने व्यक्तीच्या आभामंडलातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मन:शांती मिळते, हे वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. अध्यात्म आणि भय यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, दोषयुक्त आणि अहंयुक्त चिंतन असेल, तर भय रहाणार. अध्ययन शब्दांच्या स्तरावर राहिले, तर भय रहाणार. जोपर्यंत आपण ते कृतीत आणून त्याची अनुभूती घेत नाही, तोपर्यंत भय रहाणार. दोषमुक्त आणि अहंमुक्त होण्यासाठी दोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.
दुसर्या एका प्रश्नाचे उत्तर देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी खर्या संतांची लक्षणे सांगितली. ते म्हणाले की, विद्वानांना ज्ञानाचा अहंकार असतो आणि ते युक्तीवाद करत असतात. त्यामुळे तमोगुण निर्माण होतो. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना ‘ईश्वराकडून आले आणि कर्तेपणा विरहित समोरच्या व्यक्तीच्या शंकेचे निरसन झाले’, असा भाव हवा. या वेळी प्रा. डॉ. सुरेंद्र के. सी., डॉ. राजेश अहिराज आदी मान्यवर उपस्थित होते.
नेपाळ आणि भारत या देशांवर थोपवलेली विद्यमान लोकशाही ही लोकशाही नसून ‘सह-तानाशाही’ आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
काठमांडू : नेपाळच्या राष्ट्रीय जनता पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. मनीष कुमार मिश्र यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच भेट घेतली. या वेळी श्री. मिश्र यांनी नेपाळमधील हिंदु धर्म आणि राजकारण यांच्या स्थितीविषयी त्यांचे चिंतन मांडले.
नेपाळ आणि भारत यांवर थोपवलेल्या वर्तमान लोकशाहीविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, वर्तमान लोकशाही ही लोकशाही नसून ‘सह-तानाशाही’ आहे. येथे जनतेच्या भावनांचा विचार न करता काही लोक एकत्र येऊन राज्यघटना बनवतात, स्वत:चे निर्णय लोकांवर थोपवतात, बहुसंख्य समाजाचा विचार न करता अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करतात. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ते स्वत:चाच विचार करतात, हे या लोकशाहीचे स्वरूप बनले आहे. आपल्याला धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही सांगणार्या देशामध्ये आजही ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आहे, त्यांच्या देशाचा धर्म आहे; मग आपले ‘हिंदु राष्ट्र’ त्यांना का नको, याचे चिंतन करणे आवश्यक आहे.