हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा
दैनंदिन धर्मपालनाच्या कृतींमागील शास्त्र ठाऊक नसल्याने ते आचरणात आणण्यास हिंदूंमध्ये उदासीनता आढळते ! – मनोज खाडये
चिपळूण : आज मुसलमानांना मशीद आणि मदारशांंमध्ये, तर ख्रिस्तींना चर्च आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये धर्माचरणाचे शिक्षण मिळते; मात्र हिंदूंना ना घरात, ना शाळेत, ना देवालयात धर्माविषयी शिक्षण दिले जाते. यामुळेच देवाजवळ तेलाचा अथवा तुपाचा दिवा का लावतात ? कपाळाला टिळा का लावला पाहिजे ? देवळात प्रथम घंटानाद का केला जातो ? यांसारखे प्रश्न विचारल्यावर त्याची उत्तरे हिंदूंना देता येत नाहीत. यातूनच दैनंदिन धर्मपालनाच्या कृतींमागील शास्त्र ठाऊक नसल्याने ते आचरणात आणण्यात हिंदूंमध्ये उदासीनता आढळते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी धर्मप्रेमींना केले.
हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत चिपळूण तालुक्यातील मुरादपूर-भोईवाडी येथे श्री साईनाथ भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई मंदिरात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर श्री मनोज खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश गोरीवले, उपाध्यक्ष श्री विष्णु लाणे, सेक्रेटरी श्री महेश वसंत गुढेकर, सह-खजिनदार श्री. राजेश शंकर गोरीवले यांसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदू मंदिरात बसून तांबाखूचे व्यसन करतात, जागरण करण्यासाठी मंदिरात किंवा श्री गणेश मंडपात पत्ते खेळतात. यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते. तसेच हेे पाप स्वत:कडून होत आहे, हे त्यांना ठाऊकही नसते. याकरताच गावोगावी मंदिरातून धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि त्याकरता धर्मप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे.’’
या मार्गदर्शनानंतर श्री साई मंदिरात नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याविषयी सर्वांनी प्रतिसाद दर्शवला.