हांसी (हरियाणा) : साधना केल्यानेच धर्माची शक्ती अनुभवता येईल आणि धर्मकार्यामध्ये यश मिळेल, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे देहली अन् हरियाणा राज्यांचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी येथील हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत काढले.
श्री. कार्तिक साळुंके पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु समाजामध्ये जाऊन वैचारिक प्रबोधन करणे होय. जाती आणि वर्ण व्यवस्था यांविषयी त्यांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगावे लागेल. भारत जेव्हा स्वतंत्र झाला, त्या वेळी जवळपास ५५० जाती होत्या आणि आज त्याची संख्या ५ सहस्रांपेक्षा अधिक झाली आहे. हिंदूंची शक्ती तोडण्याचा हा प्रयत्न आहे. जात-पात, पक्ष, संप्रदाय, भाषा, प्रांत विसरून एक हिंदु म्हणून संघटित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यातूनच हिंदू ऐक्याची शक्ती दिसेल आणि हिंदु राष्ट्र स्थापन होईल.’’
बैठकीत बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. किशन गुज्जर म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्षता, जातीयवाद आदी समस्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत धर्मकार्य करणे कठीण झाले आहे. जातीयवाद इतका वाढला आहे की, प्रत्येक व्यक्ती भेटल्यावर अगोदर ‘कुठल्या जातीचा आहेस’, असे विचारते. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली आहे. त्यामुळे हिंदूंचे संघटन करणे कठीण झाले आहे.’’ या बैठकीमध्ये बजरंग दलाचे हांसी जिल्ह्याचे धर्मप्रसार प्रमुख योगी मुकेशनाथजी, सह-संयोजक श्री. संजय सिरसीया आणि कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके उपस्थित होते.