हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांना कोकण एकता प्रतिष्ठानकडून सर्वोत्कृष्ट सामाजिक पुरस्कार प्रदान
ठाणे : डोंबिवली येथील कोकण एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांना सर्वोत्कृष्ट सामाजिक पुरस्कार देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ८ मार्च २०१६ या दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, अध्यात्म आणि धर्मप्रसार इत्यादी विविध क्षेत्रांत पुढे असणार्या १० महिलांचा सत्कार केला. सौ. वेदिका पालन या अध्यात्म आणि धर्मप्रसार या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास पुढे असतात. त्यानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. सन्मान पत्र आणि पदक यांसह तुळशीचे लहान रोप देऊन प्रत्येकाचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला १०० जणांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला सत्कार प्रदान करण्यासाठी शिवसेनेचे डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेते श्री. राजेश मोरे, शिवसेना महिला शहर आघाडी अध्यक्षा सौ. कविता गावंड, हिंदी भाषी जनता परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ दुबे, शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख श्री. प्रकाश तेलगोटे, शिवसेना ग्राहक संरक्षण मंच डोंबिवली अध्यक्ष श्री. नितीन पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांच्याकडून अंनिसच्या विचारांचा प्रतिवाद, तर चर्चेचे आव्हान न स्वीकारता अंनिसच्या कु. सुशीला मुंडे यांचे पलायन !
सूत्रसंचालकाने आता एक अधार्मिक संघटना आपल्यासमोर विचार प्रकट करणार आहे, असे सांगून अंनिसच्या कु. सुशीला मुंडे यांना निमंत्रण दिले. त्या म्हणाल्या, डॉ. दाभोलकर गेल्यानंतरही अंनिसची चळवळ अधिकाधिक वाढली आहे. कुंकू लावणे, साडी नेसणे, अलंकार परिधान करण्याने जर महिलांना शक्ती मिळत असती, तर महिलांवर अत्याचारच झाले नसते. पुरस्कार स्वीकारतांना सौ. वेदिका पालन यांनी पुन्हा एकदा विचार मांडण्याची संधी मागून अंनिसच्या विचारांचा प्रतिवाद केला. त्या म्हणाल्या, अंधश्रद्धेला आमचाही विरोधच आहे. तिचे निर्मूलन व्हावे, असे आम्हालाही वाटते; परंतु धर्माचरण केल्याने देवाची शक्ती मिळते, अशी आमची श्रद्धा आहे. धर्माचरणाचे महत्त्व अनेक जण अनुभवत आहेत. कृपया या श्रद्धेचे कोणीही भंजन करू नये. या वेळी उपस्थित श्रोत्यांनी सौ. पालन यांना टाळ्यांच्या कडकडाटाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिंदी भाषी जनता परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ दुबे यांनी अंनिसच्या कार्यकर्त्या कु. सुशीला मुंडे यांना सांगितले, आपण आज येथे वाद निर्माण केला आहे. त्याविषयी मला बोलायचे आहे. त्यामुळे पळून जाऊ नका. तरीही निघून गेल्या.
क्षणचित्रे
१. कार्यक्रम झाल्यानंतर काही महिलांनी सौ. वेदिका पालन यांची भेट घेऊन विषय आवडला आणि अंनिसच्या विचारांचे खंडण करणे योग्य होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
२. डोंबिवली येथील आपला भगवा या मराठी साप्ताहिकाच्या पत्रकार कु. सारिका शिंदे यांनी संस्थेचे विविध विषयांवरील लेख साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली.
धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला पुढे !
कोकण एकता प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. भाई पानवडीकर म्हणाले, सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्तम कार्य करते. आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला पुढे आहेत. संधी मिळेल, तिथे ग्रंथप्रदर्शन लावणे इत्यादी सेवा त्या करतात. त्यांचे कार्य आम्ही अगदी जवळून पाहिले आहे. या कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. सौ. वेदिका पालन यांनी उपस्थितांना महिलांनी धर्माचरण करण्याचे महत्त्व सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात