हिंदु राष्ट्राची स्थापना हे धर्मप्रेमी संघटनांचे ध्येय असून संघटित कार्य करणे, ही काळाची आवश्यकता : विनोद चाळके, खेड भाजपचे तालुकाध्यक्ष
चिपळूण : आज हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्याकरता मी स्वतः दहीहंडी उत्सवात समितीच्या मार्गदर्शनानुसार श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन आणि आरती चालू केली. तसेच मंडळांना श्रीकृष्ण प्रतिमा भेट देण्यास प्रारंभ केला. संघटित कार्य केल्याने हे साध्य झाले. हिंदु राष्ट्र हेच हिंदु धर्मावर होणार्या सर्व आघातांंवरचा प्रभावी उपाय आहे, हे समितीचे सूत्र योग्य आहे. किंबहुना हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे धर्मप्रेमी संघटनांचे ध्येय असून संघटित कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन खेड भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. विनोद चाळके यांनी केले.
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी श्री. चाळके यांची भेट घेतली. या वेळी मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांविषयी आणि समिती त्याविषयी करत असलेली जनजागृती यासंबंधी माहिती श्री. मनोज खाडये यांनी श्री. विनोद चाळके यांच्याशी चर्चा करतांना दिली. यानंतर श्री. विनोद चाळके यांनी समितीच्या कार्याला सर्वोतोपरी सहकार्य करणार असे सांगितले. श्री. मनोज खाडये यांनी श्री. विनोद चाळके यांना सनातन पंचाग भेट दिले. या चर्चेत समितीचे श्री. संतोष घोरपडे, श्री. दत्ताराम घाग, आणि श्री. सुरेश शिंदे सहभागी झाले होते.
हिंदु विधीज्ञ परिषदेसमवेत कार्य करतांना माझ्याही ज्ञानात वाढच होईल : अधिवक्ता शाम नार्वेकर
चिपळूण : दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतांना आज राष्ट्र आणि धर्म यांची विदारक स्थिती लक्षात येते आणि त्यांच्या रक्षणासाठी कार्य करण्याचे महत्त्व पटते. माझ्या कार्यक्षेत्रात राहून मी हे कार्य करू शकतो आणि त्या करता हिंदु विधीज्ञ परिषद हे एक प्रभावी व्यासपीठ असून त्यासमवेत कार्य करतांना माझ्याही ज्ञानात वाढ होईल, असे प्रतिपादन अधिवक्ता श्री. शाम नार्वेकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्या भेटीत केले.
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. मनोज खाडये यांनी दैनिक सनातन प्रभातचे वाचक अधिवक्ता शाम नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत श्री. खाडये यांनी त्यांना समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
या भेटीत श्री. खाडये म्हणाले, ‘‘हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मंदिर सरकारीकरणामुळे देवस्थानांच्या कारभारात झालेले अनेक प्रकारचे घोटाळे माहितीच्या अधिकारात उघड करून त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यावे लागले. राष्ट्र धर्माचे कार्य करतांना न्यायालयीन प्रक्रियेचा भाग महत्त्वाचा असतो. अशा वेळी त्या क्षेत्रातील कार्य करणे, ही देव, देश आणि धर्म यांची सेवाच असून त्यालाच समष्टी साधना म्हणतात. राष्ट्र धर्माचे कार्य करणार्या संघटना आणि कार्यकर्ते यांच्यावर खोटे आरोप करणार्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विरोधात कायदेशीर दावे दाखल करण्याचे कार्य चालू आहे, या सारख्या सेवेत आपण आपला सहभाग देऊ शकता.’’
श्री. खाडये यांनी माहिती देताच अधिवक्ता नार्वेकर यांनी या कार्यात आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याचा होकार दर्शवला.
वर्तमान परिस्थितीत समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभाग घेणेे महत्त्वाचे : धर्मप्रेमी शिवाजीराव कदम
चिपळूण : व्यक्तीगत जीवनात साधना, धर्मपालन आणि बहुसंख्यांक हिंदूंचे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे समितीचे कार्य पटल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभाग घेणे महत्त्वाचे आहे, असे मनोगत धर्मप्रेमी श्री. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केले.
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी श्री. कदम यांच्या निवासस्थानी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी आंबडस शिवसेना शाखाप्रमुख श्री. संदीप मोरे आणि भेलसई येथील धर्मप्रेमी श्री. काशिनाथ कदम उपस्थित होते.
श्री. मनोज खाडये यांनी समितीच्या धर्मप्रसारासंबधी विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. श्री शिवाजीराव कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिज्ञासेने त्यावर चर्चा करतांना धर्मशास्त्र समजून घेतले. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या दृष्टीने श्री. खाडये यांनी धर्मप्रेमींशी चर्चा केली. पंचक्रोशीत या कार्यासाठी यापुढे गांभीर्याने प्रयत्न करण्याविषयी सर्व धर्मप्रेमींनी आश्वासन दिले. या वेळी श्री. खाडये यांनी कदम कुटुंबियांना सनातनचे पंचाग भेट दिले.
श्री. शिवाजीराव कदम यांनी अलीकडेच त्यांच्या नवीन वास्तूत प्रवेश केला आहे. ‘या नूतन वास्तूत धर्मप्रसार करणार्या श्री. मनोज खाडये यांचे येणे’, हे शुभसंकेत असल्याचे श्री कदम यांच्या कुटुंबियांनी सांगितले. या वेळी श्री. आणि सौ. कदम यांनी श्री. मनोज खाडये यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी समितीचे श्री. सुरेश शिंदे उपस्थित होते.