श्री यति नरसिंहानंद सरस्वती यांना हिंदु जनजागृती समितीचा पाठिंबा
मुंबई : अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक यति नरसिंहानंद सरस्वती देशामध्ये ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. देशातील संतांना अशाप्रकारचा कायदा करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसावे लागणे, हे हिंदुत्वाच्या नावावर आणि हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या केंद्र सरकारला लज्जास्पद आहे. तरी त्यांच्या राष्ट्ररक्षणार्थ आरंभलेल्या या चळवळीला हिंदु जनजागृती समितीचा पाठिंबा आहे. देशातील धार्मिक सलोखा, सामाजिक सुरक्षितता आणि देशाची अखंडता राखण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ व्हायलाच हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
श्री. शिंदे यांनी या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की,
देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मियांसाठी समान कायदे नसल्याने अल्पसंख्यांकांची लोकसंख्या भरमसाठ वाढत चालली आहे. सद्य:स्थितीत जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, मिझोराम आणि मणीपूर ही राज्ये अन् लक्ष्यद्वीप आणि निकोबार हे केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. परिणामी हीच परिस्थिती राहिल्यास वर्ष २०३० पूर्वी भारतात हिंदु अल्पसंख्य होतील, असा दावा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही केला आहे. भारतात मात्र ‘हम दो, हमारे दो’ हा लोकसंख्या नियंत्रणाचा संदेश हिंदूंसाठी दिला जातो; मात्र तोच संदेश मुसलमानांना दिला जात नाही. त्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन’ राखणारा कायदा सर्व धर्मियांना लागू केला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे.
यति नरसिंहानंद सरस्वती यांनी आरंभलेल्या उपोषणाची गेल्या १७ दिवसांत केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोणीही दखल घेतलेली नाही, हे चिंताजनक आहे. नुकतेच प्रा. जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांनी गंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी तब्बल १११ दिवस आमरण उपोषण केले आणि त्यानंतर त्यांचे देहावसान झाले, तरी केंद्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नाही. ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्यासाठी आपण जनआंदोलन उभारावे आणि सरकारला कायदा करण्यास भाग पाडावे, तसेच या आंदोलनात समस्त हिंदु बांधवांनी यथाशक्ती सहभागी व्हावे.