पंढरपूर येथे वारकरी महाअधिवेशन
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होत असलेल्या अनेक भ्रष्टाचारांच्या विरोधात वारकर्यांनी एकत्र येऊन शबरीमलाप्रमाणे लढा उभा करावा, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी केले. १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदूंवर होणारे आघात आणि वारकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येथील प.पू. बालयोगी महाराज मठ येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. पू. निवृत्ती वक्ते महाराज होते; परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित रहाता आले नाही. या अधिवेशनात हिंदूहितार्थ काही ठरावही संमत करण्यात आले.
या वेळी अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या न्यासामध्ये केलेले घोटाळे आणि भ्रष्टाचाराविषयी माहिती देऊन पंढरपूरचे पावित्र्य भ्रष्ट करणार्या मद्य मांस विक्री, चंद्रभागेचे प्रदूषण, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होत असलेले भ्रष्टाचार याविषयी अवगत केले, तसेच वारकर्यांवर होणार्या आघातांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषद नि:शुल्क लढेल, असे सांगितले. या वेळी राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे शास्त्री म्हणाले की, ‘हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ असून अंनिसचे डॉ. दाभोलकर हे हिंदू असले, तरी त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद ठेवले आहे, यावरून त्यांची निष्ठा कोणावर आहे, हे दिसून आले.’
मंदिर प्रशासनाविषयी तक्रार असल्यास तात्काळ निवारण करण्यात येईल ! – ह.भ.प. प्रकाश जवंजाळ महाराज
वारकर्यांना दर्शन किंवा मंदिर प्रशासनाविषयी काही तक्रार असल्यास भेटून मांडा. अशा तक्रारींचे तात्काळ निवारण केले जाईल, असे सांगितले. या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरवण्यात येणार्या विविध सुविधा आणि उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील महाराज झांबरे यांनी केली; तर सूत्रसंचालन ह.भ.प. जीतेंद्र महाराज, अकोला यांनी केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या घाटकोपर येथील कु. वैष्णवी शर्मा, ह.भ.प. विकासनंद मिसाळ, राष्ट्रीय वारकरी युवा सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, ह.भ.प. बापू महाराज रावकर, किशोर महाराज शिवणीकर, तसेच बालयोगी महाराजांचे शिष्य जय महाराज यांसह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकार आणि जनता यांची वैचारिक अन् आर्थिक हानी करणार्या अंनिसचा धिक्कार करा ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारला अनेक वर्षे हिशोब दाखवलेला नाही. वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धर्मादाय आयुक्त, सातारा येथे तक्रार नोंद केल्यावर अंनिसचा भ्रष्टाचार उघड झाला. अंनिसने प्रत्येक वेळी महाराष्ट्र सरकारची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरच डल्ला मारून ‘चोर तो चोर वर शिरजोर’, या म्हणीप्रमाणे महाराष्ट्र सरकार आणि जनतेची वैचारिक, बौद्धीक आणि आर्थिक हानी केलेली असल्याने अंनिसचा धिक्कार करा, असे आवाहन ह.भ.प. पू. निवृत्ती वक्ते महाराज यांनी त्यांच्या संदेशात केले. पू. वक्ते महाराज यांनी संदेशात म्हटले आहे की, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर सरकार कारवाई करत नाही, तोपर्यंत विविध पद्धतीने आंदोलन करून सरकारला कारवाई करण्यास भाग पाडावे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात २७ नोव्हेंबर या दिवशी होणार्या आंदोलनात सहभागी व्हावे.’
क्षणचित्रे
१. हिंदु विधीज्ञ परिषदेने वारकर्यांच्या विविध प्रश्नांविषयी कायदेशीर सहकार्य केले, असे राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू रावकर महाराज यांनी या वेळी सांगितले.
२. अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांचा सत्कार राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे यांनी केला.
३. या वेळी अंनिसवर कायमस्वरूपी बंदी आणावी, श्रीराम मंदिर तात्काळ उभारण्यात यावे इत्यादी विविध ठराव करण्यात आले.