इशरतचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवणारे चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
देहली : लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत लिखाण करणारे डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचा पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, या मागण्यांसाठी ९ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे धर्माभिमानी हिंदूंनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. याबरोबरच काश्मीरमध्ये ज्या मशिदींमधून देशद्रोही घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील भोंगे काढण्याबरोबरच देशातील अन्य मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगेही काढण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आंदोलनाच्या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. कथित भगवा आंतकवादाच्या नावाखाली निरपराध हिंदूंना फसवून कारागृहात टाकण्यात आल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी.
२. पाकिस्तान, बांगलादेश आणि मलेशिया या देशांमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर करण्यात येत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी संबंधित देशांवर दबाव निर्माण करावा.
३. विदेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात भारताने संयुक्त राष्ट्र संघाकडे न्याय मागावा.
४. तमिळनाडू, केरळ आणि आग्रा येथे करण्यात आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावी.
देशाचा विश्वासघात करणार्या नेत्यांची चौकशी व्हावी ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
सध्या भारताच्या शत्रूंना देशातील देशद्रोही घटना पाहून आनंद होत असेल; कारण त्यांचे काम आतली लोकच करत आहेत. देशाला नष्ट करण्यासाठी पाकिस्तान किंवा अन्य देशातून आलेल्या लोकांना आपण शत्रू म्हणतो; परंतु ज्यांना आम्ही निवडून दिले, तेच देशाचा विश्वासघात करत असतील, तर त्याला काय म्हणावे ? अशा विश्वासघातकी नेत्यांची चौकशी झाली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात