फोंडा : शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, तसेच केरळ येथील ननवरील बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी आणि आरोपी बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांचा जामीन रहित करावा, या मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रवेशप्रकरणी निर्णय दिल्यानंतर केरळ राज्यात ठिकठिकाणी हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला आणि पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात निषेधमोर्चे आयोजित केले अन् महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध दर्शवला. धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आंदोलन करणार्या भक्तांना केरळ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही गोष्ट दुर्दैवी अन् निषेधार्ह आहे.
केरळमधील कोट्टयम येथील सिरो-मालाबार चर्चमधील एका ४४ वर्षीय ननवर बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांनी १३ वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली केरळ पोलिसांनी त्यांना अटक केली. फ्रॅन्को यांचा गुन्हा गंभीर असूनही त्यांना काही दिवसांतच जामीनही संमत करण्यात आला. फ्रॅन्को यांना जामीन संमत झाल्यावर लगेचच त्यांच्या विरोधात साक्ष देणारे फादर कुरियाकोस कट्टूथारा यांची संशयास्पदरित्या हत्या झाली. ही गोष्ट गंभीर आहे. फादर कुरियाकोस ननवरील बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार असल्यानेच त्यांची हत्या झाली आहे का, याचेही तात्काळ अन्वेषण व्हायला हवे. शेवटी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.
क्षणचित्र
आंदोलनात खेलन गावडे हे स्वतःहून सहभागी झाले. ते म्हणाले, तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात. मी माझ्या परीने आपल्याला साहाय्य करीन. हिंदूंनी आज संघटित व्हायला हवे.