Menu Close

श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि घटनात्मक मार्गाने प्रयत्न करावा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

म्हापसा : ख्रिस्ती म्हणतात, भारताला ख्रिस्ती राष्ट्र करायचे आहे. धर्मांध म्हणतात, भारताला इस्लामिक राष्ट्र करायचे आहे. मग हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी का प्रयत्न करू नयेत ? हिंदु राष्ट्र ही व्यापक संकल्पना आहे. सकल विश्‍वाला आनंद देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि घटनात्मक मार्गाने प्रयत्न करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीने श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी साधना, धर्माचरण आणि सनातन संस्थेला होणारा विरोध याविषयी मार्गदर्शन केले. सौ. दीपा महालदार यांनी सौ. शुभा सावंत यांचे स्वागत केले, तर देवस्थानचे खजिनदार श्री. प्रदीप वसंत हळदणकर यांनी श्री. गोविंद चोडणकर यांचे स्वागत केले. गोवा राज्यातील ही ७६ वी सभा होती. या सभेचे सूत्रसंचालन कु. चैताली हळदणकर यांनी केले.

या वेळी श्री. चोडणकर पुढे म्हणाले,

१. जे इतिहास घडवणारे असतात, ते इतिहास विसरत नाहीत. जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवत नाहीत. गिरी गावातील महिला पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवरायांचा इतिहास ४ ओळींत दिल्याविषयीच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या पाठ्यपुस्तकात नंतर पालट करून छत्रपतींचा इतिहास विस्तृत घेण्यात आला. या महिलांनी जो इतिहास घडवला, तो कौतुकास्पद आहे.

२. हिंदु राष्ट्र ही व्यापक संकल्पना आहे. सकल विश्‍वाला आनंद देेणारे हे राष्ट्र असेल. या राष्ट्रात सर्व पंथांचे लोक असतील. हिंदु या शब्दाचा अर्थ मेरूतंत्र ग्रंथात स्पष्ट केला आहे. हा अर्थ केवळ विशिष्ट पंथापुरता संकुचित नाही.

३. संपूर्ण जगाचा अभ्यास केला, तर प्रत्येक पंथाला स्वत:चा देश आहे. केवळ हिंदूंना स्वत:चा देश नाही. आपण धर्मनिरपेक्ष देशात जगत आहोत. वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारेच देशाची फाळणी केली, तरीही काँग्रेसने भारत देशाला धर्मनिरपेक्ष केले. याचीच विषारी फळे आज आपण भोगत आहोत.

४. ब्रिटीश देशाला स्वातंत्र्य देतांना ख्रिस्ती धर्मप्रसारकांना येथे सोडून गेले. त्यांना धर्मप्रसार करण्यासाठी सोपे व्हावे, यासाठीच हा देश धर्मनिरपेक्ष करण्यात आला. हे मोठे षड्यंत्र आहे.

५. आपण ज्या धर्मनिरपेक्ष देशात जगत आहोत, तेथे गाईंची हत्या होते. त्यांचे रक्षण करणार्‍या गोप्रेमींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. श्रीराम मंदिर बांधण्याचे आश्‍वासन केवळ निवडणूक जवळ आली की, दिले जाते. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होत नाही. हे सगळे धर्मनिरपेक्षतेचे दुष्परिणाम आहेत.

६. मदरशांमधून अतिरेकी बाहेर पडतात, हे खुद्द मुसलमान नेतेच सांगत आहेत. सद्यःस्थितीत पाकिस्तानपेक्षा भारतात मदरशांची संख्या प्रचंड आहे. आयएस्आयला भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन करायचे आहे. इतके मोठे षड्यंत्र चालू असतांना आपण  घरी बसणार आहोत का ? या आतंकवाद्यांना कोण रोखणार ?

७. शबरीमला मंदिराची परंपरा ५०० वर्षांपूर्वीची आहे. अशा परंपरा मोडीत काढण्यासाठी केरळचे साम्यवादी सरकार धडपडत आहे. ही सर्व हिंदु धर्मावरील आक्रमणेच आहेत. ही आक्रमणे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी कटीबद्ध होऊया.

सनातन संस्थेला कट्टरतावादी, आतंकवादी अशी विशेषणे लावून मानहानी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

१. हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी काही जन्महिंंदू प्रयत्न करत आहेत, हे दूरचित्रवाणीवरील चर्चासत्रांतून दिसून येते. त्यांना विचारवंत म्हटले जाते. या विचारवंतांना गुलामगिरीतच आनंद वाटत आहे. म्हणूनच ते हिंदूंमध्ये बुद्धीभेद करण्यासाठी धडपडत आहेत. ही गुलामगिरी झिडकारून पुढे जाण्यासाठी सनातन संस्था जागृती करत आहे. हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न चालू असतांना त्याला जोरदार विरोध चालू आहे. हा प्रयत्न हिंदूंनी संघटितपणे हाणून पाडला पाहिजे.

२. सनातन संस्था अध्यात्माचा प्रसार करते. सर्वजण आनंदीत व्हावेत, या उद्देशाने साधनेचा प्रचार करत आहे; मात्र सनातन संस्थेला कट्टरतावादी, आतंकवादी अशी विशेषणे लावून मानहानी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, तरीही संस्था आणि समिती यांच्या कार्याची घोडदौड चालूच आहे.

३. सध्या लोक पुरोगामी, आधुनिकतावादी म्हणवून घेण्यात धन्यता मानत आहेत. ते स्वत:ला विचारवंत म्हणवतात. हे समाजाला रसातळाला नेत आहेत. अशांना वैचारिक विरोध करणे, हे आपले कर्तव्य आहे. सनातन संस्था वैचारिक लढा देत असतांनाच काही धर्मविरोधकांची हत्या झाली. या हत्यांचे अन्वेषण करणार्‍या यंत्रणांनी संशयित म्हणून सनातनच्या काही साधकांना अकारण गोवले. अन्वेषण यंत्रणांच्या बाजूने न्यायालयात केले जाणारे युक्तीवाद किती हस्यास्पद आहेत, हे दैनिक सनातन प्रभातमधून वेळोवेळी प्रसिद्ध होत आहे, म्हणून दैनिक सनातन प्रभातचा अभ्यास करा.

४. सनातन संस्था या धर्मविरोधी विचारवंतांच्या विरोधात उभी ठाकली आहे. यापुढेही ठामपणे उभे रहाणार आहे. आम्ही न्याय मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच विरोध करणार आहोत. त्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही.

५. हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍यांच्या मागे देशातील सर्व अन्वेषणयंत्रणा हात धुवून मागे लागलेल्या असतात. याचे एकमेव कारण धर्मासाठी कार्य करणार्‍यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे षड्यंत्र आखले आहे. हिंदूंनी संघटित होऊ नये, यासाठी ही सगळी धडपड आहे; पण त्यांनी कितीही धडपड केली, तरी हिंदु राष्ट्राची पहाट उगवल्याशिवाय रहाणार नाही. जोपर्यंत हिंदु राष्ट्र येत नाही, तोपर्यंत सनातन संस्था स्वस्थ बसणार नाही, कारण सनातन संस्थेच्या पाठीशी ईश्‍वराची अर्थात धर्माची शक्ती आहे.

क्षणचित्रे

१. सभेच्या आरंभी अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्रीरामाचे नामस्मरण आणि जयघोष करण्यात आला.

२. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी काही वर्षांपूर्वी गोव्यात महिलांनी एक आंदोलन छेडले होते. त्याचा आरंभ याच गिरी गावातून करण्यात आला होता. ते आंदोलन यशस्वी झाले होते. याची आठवण सौ. शुभा सावंत यांनी करून दिली आणि तेथील महिलांचे कौतुक केले.

३.हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे उल्लेखनीय कार्य ही ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.

४. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

५. स्वागतकक्षावर शासनाला देण्यासाठी निवेदने ठेवण्यात आली होती. त्यावर धर्माभिमान्यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *