अयोध्या : राममंदिर बनवले नाही, तर विद्यमान सरकारही पुन्हा बनणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. ‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
श्री. उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास श्रीरामजन्मभूमीवर जाऊन सहकुटुंब श्री रामललाचे दर्शन घेतले. ते तेथे १० मिनिटे होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील विधान केले.
श्री. ठाकरे पुढे म्हणाले कीे,
१. अयोध्या दौर्यामागे आमचा कुठलाही छुपा हेतू नाही. देशातील समस्त हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येत आलो आहे. ‘राममंदिर कधी बांधणार ?’, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
२. राममंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचा असेल, तर निवडणुकीत रामाच्या नावावर मते मागू नका.
३. ‘निवडणुका आल्या की, ‘राम राम’ आणि नंतर ‘आराम’, हेच भाजप सरकारचे काम आहे. राममंदिरासाठी आणखी किती दिवस वाट पहायची ? सरकारने हिंदूंच्या भावनांशी खेळू नये. आता हिंदू मार खाणार नाहीत. ‘मंदिर कधी होणार ?’, असा प्रश्न ते विचारणारच.
४. श्री रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात जात असतांना ‘मी कारागृहात जात आहे कि मंदिरात’ हेच मला कळत नव्हते. याचे दुःख वाटत होते.
५. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते की, अयोध्येत राममंदिर होते, आहे आणि राहील; पण दुर्दैवाने ते दिसत नाही. सरकारने लवकरात लवकर राममंदिर उभारले पाहिजे.
अयोध्येत शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन !
अयोध्येत शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन युवा सेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ‘प्रभु श्रीरामांचे दर्शन घेऊन हिंदुत्वाच्या नवीन पर्वाचा आरंभ करत आहोत’, असे श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेच्या वतीने लवकरच अयोध्येत शिवसेना सदस्य नोंदणीचा आरंभही करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
शिवसेनेच्या सभेला अनुमती नाकारली
शिवसेनेने २५ नोव्हेंबरला अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला पोलिसांनी अनुमती नाकरली, असे वृत्त विविध वृत्तवाहिन्यांकडून दाखवले जात होते.
रामजन्मभूमीच्या जागेत अद्भुत शक्ती आणि तेज आहे ! – उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास श्री रामललाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मी रामजन्मभूमीच्या पवित्र जागी गेलो. तेथे प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. मला रोमांचित अनुभव आला. त्या जागेत अद्भुत शक्ती आणि तेज आहे, तसेच तेथे चेतनाही आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात