यवतमाळ
यवतमाळ येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक हिंदूंनी स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. आंदोलनातील विषय ऐकून जिज्ञासू स्वाक्षरी करण्यासाठी येत होते. वरील मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यासाठी २६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
या आंदोलनामध्ये इस्कॉन संप्रदायाचे श्री प्रसन्नदास महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रभाकर डंभारे, श्रीराम नवमी उत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनावर पोलिसांची दृष्टी !
पोलीस अधीक्षक कार्यालयातील गोपनीय शाखेच्या पोलिसांनी आंदोलनाची पूर्वसिद्धता चालू असतांना चित्रीकरण केले. आंदोलनासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणेची अनुमती देतांना संबंधित पोलिसांकडून अर्जदाराला कलम १४९ अंतर्गत नोटीस देण्यात आली.
नागपूर
मंदिरांचे धन लुटणारा निर्णय अत्यंत निषेधार्ह ! – विद्याधर जोशी
धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणार्या शासनाने चारा छावण्यांसाठी मंदिरांचा निधी वापरण्याऐवजी ते चर्च आणि मशिदी यांचा निधी का घेत नाहीत ? मंदिरांचे धन लुटणारा हा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. शासनाने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता चारा छावण्यांना देवस्थानचा निधी देण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय तात्काळ रहित करावा, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी केली. ते संविधान चौक, नागपूर येथे २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आलेले शासन प्रतिदिन हिंदूंच्या मंदिरांतील पैसा विविध शासकीय योजनांच्या नावाखाली लाटायला लागले आहे. हिंदूंची मंदिरे ही शासनाला दुभती गाय वाटत आहे. सामूहिक विवाह सोहळे, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळ निवारण, मुख्यमंत्री साहाय्यता निधी या सर्व योजनांसाठी मंदिरांचा पैसा, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या दौर्यासाठी मंदिरांचा निधी अशा विविध कारणांसाठी देवस्थानांचा निधी मागितला जात आहे. हिंदु भाविक शासन चालवण्यासाठी मंदिरांमध्ये धन अर्पण करत नाहीत.
वणी (यवतमाळ)
चारा छावण्यांना देवस्थानाचा निधी देण्याचा धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला निर्णय तात्काळ रहित करा ! – लोभेश्वर टोंगे
वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आलेले सरकार प्रतिदिन हिंदूंच्या मंदिरांतील पैसा विविध शासकीय योजनांच्या नावाखाली लाटायला लागले आहे. आजवर मंदिरांतील सरकारी विश्वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचारांचे केवळ ‘चौकशांचे फार्स’ चालू असून देवधनाची लूट करणारे मोकाटच फिरत आहेत ! यांच्याविषयी काहीही न करता चारा छावण्यांना देवस्थानाचा निधी देण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय तात्काळ रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. लोभेश्वर टोंगे यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली. आंदोलनात सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच शिवसेनेचे १० कार्यकर्ते उपस्थित होते.
तिन्ही आंदोलनांमध्ये केलेल्या मागण्या
- केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर केरळसह भारतभरातील विविध हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला अन् पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे आयोजित केले अन् महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध दर्शवला. आंदोलन करणार्या भक्तांपैकी ३ सहस्र ५०० हून अधिक भक्तांना केरळ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
- शनिशिंगणापूर मंदिरातील धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी कायदा करावा !
- केरळ येथील ननवरील बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी आणि आरोपी बिशप फ्रॅन्को मुलक्कल याचा जामीन रहित करावा !