अत्यंत संकुचित विचारसरणीचे काही पंथ, तर अतिशय उदार विचारसरणीचा हिंदु धर्म !
‘काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. (‘एखाद्या धर्मग्रंथावर भाष्य करणे वा लिहिणे’, म्हणजे त्या धर्मग्रंथाचा आपल्या परीने अन्वयार्थ काढून त्या धर्मग्रंथातील ज्ञानाचे विश्लेषण करणे होय. या विश्लेषणामध्ये मूळ धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानापेक्षा वेगळा विचारही मांडलेला असू शकतो.) त्या पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथियांनी केवळ त्या धर्मग्रंथात दिलेल्या ज्ञानालाच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करावे. जर कोणी धर्मग्रंथावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पंथबाह्य केले जाते. याउलट सहस्रो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर आज कोणीही भाष्य करू शकतो, उदा. ‘भगवद्गीता’ या धर्मग्रंथावर लोकमान्य टिळकांनी लिहिलेले ‘गीतारहस्य’ हे भाष्य. अनेक जण एखाद्या ग्रंथावर अशी वेगवेगळी भाष्ये लिहू शकतात. थोडक्यात हिंदु धर्मात प्रत्येकाला अगदी धर्मग्रंथांवरही स्वतःची मते, भाष्य आदी प्रतिपादन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
‘ब्रह्मांडामध्ये अनंत ज्ञान आहे. काळानुसार आणि आवश्यकतेनुसार ते ज्ञान विविध माध्यमांतून मानवाकरता पृथ्वीतलावर अवतरित होते’, असे हिंदु धर्म मानतो. ज्ञान अनंत असल्यामुळेच अनंत काळ ते ग्रहण करण्याची प्रक्रियाही चालू रहाते. सध्या सनातनच्या काही साधकांना ब्रह्मांडात असलेले नाविन्यपूर्ण अध्यात्मशास्त्रीय ज्ञान विविध विषयांवर मिळत आहे आणि पुढेही मिळत राहील.
धर्मज्ञानाच्या संदर्भातील इतकी उदार विचारसरणी हिंदु धर्म सोडून अन्य कोणत्या पंथात आहे का ? यासाठीच ‘सर्वधर्मसमभाव’ ही किती पोकळ वल्गना आहे’, यावर राजकीय नेते अंतर्मुख होऊन विचार करतील का ?’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१६.११.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात