नवी देहली : शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे हरियाणा आणि पंजाब समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी केली. नुकतेच येथील संसद मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त ते बोलत होते.
श्री. मुंजाल पुढे म्हणाले, ‘‘केरळच्या शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळ राज्याच्या थिरुवनंतपुरम्, कोल्लम्, अलाप्पुजा, पठानमथिट्टा, एर्नाकुलम् आणि पलक्कड येथे विविध हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रावधी महिला अन् पुरुष यांनी निषेधमोर्चे आयोजित केले अन् महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध दर्शवला. या आंदोलन करणार्या भक्तांपैकी ३ सहस्र ५०० हून अधिक भक्तांना केरळ पोलिसांनी अटक करून त्यांचावर गुन्हे प्रविष्ट केले. धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आंदोलन करणार्या भक्तांवर गुन्हे दाखल होणे आणि त्यांना अटक करणे दुर्दैवी अन् निंदनीय आहे.’’
प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा उद्योगपती श्री. सुभाष जिंदाल आणि विश्व हिंदु परिषदचे श्री. हरकेश चौहान यांनी आंदोलनाला संबोधित केले.
केरळच्या नन बलात्कार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार फादर कुरियाकोस यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा !
केरळच्या कोट्टयम येथील सिरो-मालाबार चर्चच्या ४४ वर्षीय ननवर बिशप फ्रेन्को मुलक्कल यांनी १३ वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. फ्रेन्को यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचा असतांनाही काही दिवसांतच त्यांना जामीन मिळाला. फ्रेन्को यांना जामीन मिळाल्यानंतर लगेच त्यांच्या विरोधात साक्ष देणारे फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा मृतदेह २२ ऑक्टोबरला सेंट मेरी चर्चमध्ये संशयास्पद स्थितीमध्ये आढळला होता. फादर कुरियाकोस हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रेन्को मुलक्कल यांना मिळालेला जामीन रहित करण्यात यावा, तसेच फादर कुरियाकोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये करण्यात आली.