सांगली : चित्रपटनिर्माते सत्य घटना न दाखवता ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळेल, अशा कथा चित्रपटांमधून दाखवतात. केदारनाथ चित्रपटाच्या विषयीही तेच घडत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु युवतींना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढता येते, असा संदेशच देण्यात आला आहे. तरी शासनाने हिंदूंच्या भावनांची नोंद घेऊन अशा चित्रपटांचे प्रदर्शन रोखले पाहिजे, असे मनोगत गोरक्षा समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन पवार यांनी व्यक्त केले. ते १ डिसेंबर या दिवशी मारुति चौक येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, सौ. मधुरा तोफखाने यांनीही उपस्थितांना संबोधित केले. कु. प्रतिभा तावरे यांनी सूत्रसंचालन केले.
विशेष
१. आंदोलनाच्या कालावधीत रस्त्यावरून येणारे-जाणारे अनेक जण थांबून विषय ऐकत होते, तसेच नेमका विषय समजून घेत होते. काहींनी विषय ऐकल्यावर ‘आम्हीही अशा चित्रपटांना विरोध करू’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
२. आंदोलनाचे ‘फेसबूक’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हे आंदोलन ६० पेक्षा अधिक लोकांनी ‘लाईव्ह’ पाहिले, तर ७ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले.