मदर तेरेसा यांच्या चमत्काराच्या दाव्यासमोर शाम मानव आणि अंनिस गप्प का ?
नागपूर : सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या चमत्काराला मान्यता देऊन त्यांचा संत होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एरव्ही हिंदु धर्मातील एखाद्या संतांनी चमत्काराचा दावा केल्यावर त्या विरोधात दंड थोपटणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव आणि दाभोलकरांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आता ख्रिस्त्यांनी उघडपणे चमत्काराचा दावा केल्यावर कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ? या घटनेला चार-पाच दिवस होऊनही शाम मानव यांनी वा अंनिसने याविषयी साधी प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. मानव आणि अंनिसला हा चमत्कार मान्य आहे, असेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांपासून चमत्काराच्या दाव्यासाठी ठेवलेले २१ लाख रुपयांचे बक्षिस संबंधितांना देऊन स्वतःचा नैतिक पराभव मान्य करावा आणि समाजाची क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
श्री. घनवट यांनी पुढे म्हटले आहे की, मदर तेरेसा यांच्या चमत्काराचा दावा हा जरी आताचा असला, तरी कित्येक वर्षांपासून अनेक ख्रिस्ती फादर, धर्मप्रसारक आणि मिशनरी शहरांपासून आदिवासी पाड्यापर्यंत जाऊन, जाहीर सभांतून, दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमांतून पीडित आणि आजारी लोकांचे असाध्य रोग (उदा. एडस्, कॅन्सर) बरे केल्याचा दावा उघडपणे करत असतात. याला कधी शाम मानव वा अंनिस यांनी विरोध करून त्यांना उघडे पाडले किंवा एखाद्या भोंदू ख्रिस्ती फादरला पकडून दिल्याचे कधी ऐकिवात नाही. संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या चमत्कारावर टीका करणारे शाम मानव आता मदर तेरेसा यांच्या चमत्काराविषयी मौन बाळगतात. यावरून अंधश्रद्धा निर्मूलनवाले केवळ हिंदु धर्मातील संत, प्रथा-परंपरा यांच्या विरोधात कार्य करतात, हे यातून सिद्ध होते.
श्री. घनवट यांनी पुढे म्हटले आहे की, मदर तेरेसा यांनी स्वतःच मी समाजसेविका नाही, तर मी केवळ येशूची नन (ख्रिस्ती धर्मप्रसारक) आहे असे लिहून ठेवले आहे. अशा मदर तेरेसा यांनी गोर-गरिबांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य केले, असा आभास भारतातील निधर्मी मंडळी निर्माण करत असतात. मदर तेरेसा यांनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी गरीब आणि पीडित हिंदूंचे धर्मांतर करण्याचे जे चमत्कारी कार्य केले, त्याचा गौरव आता चर्च संस्थांकडून त्यांना संतपद देऊन केला जात आहे. यातून भारतात मोठ्या प्रमाणात होणार्या हिंदूंच्या धर्मांतराला प्रोत्साहनच दिले जात आहे. चर्च संस्थेच्या या धोरणाचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात