श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
मुंबई : शिर्डी येथील श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नुकतेच शासनाला सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्या कर्जाला व्याज, मुदत किंवा कशाचीही हमी नाही. आधीच कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या राज्याकडून हे कर्ज फिटण्याची अपेक्षा करणे, म्हणजे चमत्कारच मानावा लागेल. अशा प्रकारे व्यावहारिकदृष्ट्याही असे कर्ज कोणी देत नाही. हे कर्ज नव्हे, तर ५०० कोटी रुपयांचे दानच हावरे यांनी शासनाच्या पदरात टाकले आहे. शासनाच्या वशिल्यावर श्री साई संस्थान न्यासाचे विश्वस्त बनलेल्या हावरे यांना ट्रस्टचा पैसा हा काय स्वतःच्या मालकीचा वाटत आहे का ? हावरे यांनी हे लक्षात ठेवावे की, ते विश्वस्त आहेत, न्यासाचे मालक नव्हे ! साईभक्तांनी श्री साईचरणी अर्पण केलेले धन हावरे यांनी कोणाला विचारून शासनाला कर्ज म्हणून दिले ?, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला आहे. तसेच ‘हावरे यांनी याचे उत्तर साईभक्तांना द्यायलाच हवे’, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले…
१. मंदिरांचे विश्वस्त ‘भक्त’ नसतील, तर देवनिधीची कशा प्रकारे लूट होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
२. शासनाला सिंचन प्रकल्पासाठी जर पैशांची आवश्यकता असेल, तर राज्य चालवणारा भाजप ६ सहस्र ३०० कोटी रुपयांचा स्वतःचा पक्षनिधी का वापरत नाही ? पक्षनिधी हा पक्षासाठी वापरायचा असतो, हे कळते, तर मग देवनिधी देवासाठी वापरायचा असतो, हे कसे कळत नाही ? देवनिधीची लूट हे महापाप असून ते लुटणार्यांना फेडावेच लागेल.
३. सरकारने आतापर्यंत अनेकदा हिंदूंच्या मंदिरांचा पैसा घेतला; मात्र एकदाही वक्फ बोर्डाकडून किंवा ख्रिस्त्यांच्या संस्थांकडून दमडी घेण्याची हिंमत दाखवली नाही, असे का ?
४. आजवर हिंदूंनी इतका विरोध करूनही हिंदूंच्या विरोधाला न जुमानता हिंदु मंदिरांची ही लूट चालूच आहे. त्यामुळे आता हिंदु जनजागृती समिती हिंदूंनी मंदिरांमध्ये पैसे अर्पण न करता ‘मंदिर सरकारीकरण रहित करा’, ‘मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी वापरा !’ अशा आशयाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी निवडून त्याप्रमाणे निषेध आंदोलन चालू करणार आहे.