सावर्डे : भारतात हिंदूंचे बहुसंख्य प्रमाण असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? जगाचा विचार केल्यास अन्य देशांमध्ये ज्या धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात, तो देश त्या धर्माचे राष्ट्र म्हणून ओळखला जातो. भारतातही ही स्थिती निर्माण होण्यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे. हा गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे. त्याला काठ्या लावणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हिंदूंना अत्याचार, अन्याय यालाच सामोरे जावे लागले आहे. या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश लाड यांनी केले. तालुक्यातील शिरंबे, सडेवाडी येथे समितीच्या वतीने श्री. राजाराम मते यांच्या घरी ग्रामबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. सुरेश लाड पुढे म्हणाले की, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्वरी अधिष्ठान महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवीची उपासना करून आध्यात्मिक प्रगतीसमवेत हिंदवी राज्याची स्थापना केली. कुलदेवीच्या उपासनेमुळेच भवानीमातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता; म्हणून आपण सर्वांनी आपल्या कुलदेवीचे नामस्मरण आतापासूनच करूया. या वेळी सनातन संस्थेचे श्री. शिवराम बांद्रे उपस्थित होते. तसेच या बैठकीचा लाभ ६० जणांनी घेतला.