हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी !
पोलिसांनी ऐनवेळी आडमुठी भूमिका घेऊन आणि मार्ग पालटूनही ७० दुचाकी, ४ चारचाकी वाहने यांच्यासह २०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !
बेळगाव : वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला जाणीवपूर्वक निर्माण केलेला अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १३ मार्च या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आयोजित वाहन फेरीची सांगता झाल्यानंतरच्या सभेत ते बोलत होते. पोलिसांनी ऐनवेळी मार्ग पालटूनही या फेरीत ७० दुचाकी, ४ चारचाकी वाहन यांच्यासह २०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. शहरातील बॅरिस्टर नाथ पै चौक येथून वाहनफेरीचा प्रारंभ झाला. प्रारंभी धर्माभिमानी डॉ. समीर कुट्रे यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. धर्मध्वजास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.
पोलिसांचे आडमुठे धोरण !
१० मार्च या दिवशी सकाळी १० वाजता फेरीचा प्रारंभ होणार होता. या फेरीसाठी ९ मार्च या दिवशी पोलिसांची लेखी अनुमती मिळाली होती. इतके सगळे असतांना १० मार्च या दिवशी फेरी चालू होण्याच्या १५ मिनिटे अगोदर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अचानक येऊन तुम्हाला वाहनफेरीची अनुमती नाकारण्यात आली आहे. तुम्ही पदफेरी काढा, तेही आम्ही सांगतो त्या मार्गावरून, असे सांगितले.
या कार्यात पाठिंबा दर्शवणारे काही राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि हिंदु धर्माभिमानी अधिवक्ता यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधल्यावर नंतर परत दुचाकी फेरीस अनुमती देण्यात आली; मात्र ऐनवेळी नियोजित मार्गात केलेला पालट तसाच ठेवण्यात आला. यामुळे या मार्गात सहभागी होणार्या अनेक हिंदु बांधवांना फेरीत सहभागी होता आले नाही. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, हिंदु एकतेचा विजय असो, अशा घोषणांनी बेळगाव शहर दुमदुमले.
या वेळी एक पोलीस अधिकारी खाजगीत बोलतांना म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत हिंदु जनजागृती समिती धर्मसभांच्या माध्यमातून करत असलेले समाज प्रबोधनाचे कार्य अत्यंत शिस्तबद्ध आणि सनदशीर मार्गाने करत आहे; मात्र वरिष्ठांचा आदेश असल्याने माझा नाईलाज आहे.
क्षणचित्रे
१. वडगाव येथील बनशंकरी मंदिरासमोरून वाहनफेरी जात असतांना मंदिरासमोरील वृक्षावरील पिवळ्या फुलांचा वाहनफेरीवर वर्षाव झाला. हा ईश्वराने हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी दिलेला आशीर्वाद होता, असे मत अनेक हिंदु धर्माभिमान्यांनी व्यक्त केले.
२. रस्त्याच्या दुतर्फा हिंदु बांधवांनी गर्दी करून त्यांचा सहभाग नोंदवला. फेरीमार्गावर काही घरांमधील लहान मुले गच्चीवरून घोषणांना प्रतिसाद देत होती.
३. फेरीमार्गावर काही धर्माभिमान्यांनी कोरे गल्लीत धर्मध्वजाचे पूजन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात