हिंदु जनजागृती समितीची सभा
दापोली : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांच्याकडून योग्य धर्माचरण होत नाही आणि त्यामुळे धर्माविषयी जागृतीही नाही. याचा परिणाम धर्मावरील संकटांविषयी अनभिज्ञता आहे. खरे तर धर्मरक्षणासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे; मात्र याविषयी उदासीनता आढळते. गुरुकुल शिक्षणपद्धती नष्ट होऊन मेकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षणपद्धती चालू झाल्याने विचारधारा पालटली आहे. इंग्रजी शिक्षणामुळे भोगवाद वाढला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आले आहे. धर्मशिक्षण नसल्यामुळे संस्कार नष्ट झाले आहेत. उत्सवातील अपप्रकार वाढले आहेत. हिंदूंच्या देवतांची अनेक ठिकाणी विटंबना होत आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने भाविकांनी श्रद्धेपोटी अर्पण केलेल्या धनाचा गैरवापर होत आहे. हे सर्व थांबवायचे असेल, तर हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे. धर्म म्हणजे ईश्वर आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळेल’, असे प्रतिपादन अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सभेमध्ये केले.
तालुक्यातील श्री सप्तेश्वर मंदिर, पंचनदी येथे २ डिसेंबर २०१८ या दिवशी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी टिळा आणि कुंकू लावण्याचे महत्त्व, वाढदिवस तिथीनुसार कसा साजरा करायचा, याविषयी मार्गदर्शन केले. या सभेचा ९० धर्माभिमानी हिंदूंनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. सभेच्या आयोजनासाठी श्री. सुहास मोडक यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच श्री. सुनील वैशंपायन, श्री. संजय मालगुंडकर आणि श्री. वसंत मालगुंडकर यांनी सहकार्य केले.
२. पंधरा दिवसातून एक धर्मशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.
३. बोरिवली येथे ग्रामबैठकीचे नियोजन झाले आणि या बैठकीच्या नियोजनासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे.
अभिप्राय
१. श्री. मकरंद मोडक, पंचनदी, दापोली : हा कार्यक्रम मला खूप आवडला. या धर्मकार्यासाठी आम्ही आमच्या परिने धर्मजागृतीचे कार्य करत राहू.
२. श्री. पांडुरंग रामचंद्र म्हातले, मु. आघारी, पो. पंचनदी : हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभातने हिंदु राष्ट्र स्थापनेचे हाती घेतलेले कार्य चांगले आहे. यामध्ये माझा पूर्णत: सहभाग असेल.