हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? विदेशी आस्थापने येथील वैद्यकीय क्षेत्रात करत असलेला भ्रष्टाचार भाजप सरकार स्वतःहून का निपटून काढत नाही ?
नवी देहली : अमेरिकास्थित ‘स्ट्रायकर’ आस्थापनाकडून भारतात चालू असलेले अपव्यवहार आणि घोटाळे यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अधिकार्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, तसेच या मंत्रालयाचे केंद्रीय सचिव यांना पत्रकाद्वारे केली आहे. भारतात हाडांसंबंधीच्या प्रत्यारोपण यंत्रांची विक्री करणार्या ‘स्ट्रायकर’ आस्थापनाने भारतात अपव्यवहार केल्याची स्वीकृती दिल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने २८ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले.
या आस्थापनाने भारतातील आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांना भ्रष्टाचारात सहभागी करून घेतल्याचे मान्य केले आहे. ‘स्ट्रायकर’ आस्थापनाची भारतात नवी देहली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. अमेरिकेतील आर्थिक व्यवहार नियमन करणार्या ‘सेक्युरिटीस अँड एक्सचेंज कमिशन’ने (एस्ईसीने) ‘स्ट्रायकर’ आस्थापनाला भारतात भ्रष्टाचाराविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ५५ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. ‘एस्ईसी’च्या अहवालानुसार ‘स्ट्रायकर’ आस्थापनाचे भारतातील वितरक आणि इतर दोन आस्थापना मोठ्या रुग्णालयांना लाच देण्याचे व्यवहार बघत असत. तसेच ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्र आणि सफदरजंग रुग्णालय या दोन्ही सरकारी मालकीच्या रुग्णालयांना प्रत्यारोपण यंत्रे विकत असत.
वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटण्याची मागणी
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्दैवी घटना आहे. एखादी विदेशी आस्थापना तिची उत्पादने खपवण्यासाठी भारतातील आधुनिक वैद्यांना लाच दिली जाऊ शकते, हे समोर आले आहे. भारतातील गरीब आणि अशिक्षित रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. ‘इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६’ने आधुनिक वैद्यांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे. हा समाजाच्या विरोधातच नव्हे, तर राष्ट्राच्या विरोधात गुन्हा आहे. अमेरिकेच्या सरकारकडून ‘स्ट्रायकर’ची या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागवून घ्यावीत, तसेच ‘स्ट्रायकर’च्या भारतातील शाखांची कसून चौकशी करावी आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी श्री. शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे केली आहे.