भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?
पुणे : दहीहंडी आणि गणेशोत्सव या सणांच्या वेळी सरकारने ध्वनीक्षेपकांच्या आवाजाविषयी निर्बंध घातले होते, तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीने सनबर्न फेस्टिव्हलला विरोध केला आहे. ‘‘सणांच्या कालावधीत मोठ्या आवाजाची डॉल्बी यंत्रणा सहन केली जाणार नाही’, असे सरकार सांगते. मग ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला मुभा का ? तेथे वेळेची आणि आवाजाची मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला कायदेशीर अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे.
त्यानंतरही कार्यक्रमाला अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हा कार्यक्रम रहित केला नाही, तर आयोजक अरविंदर सिंह यांच्या तोंडाला काळे फासू’, अशी चेतावणी पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे अधिवक्ता राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. (संस्कृतीप्रेमींचा प्रचंड विरोध असूनही वारंवार कायदे आणि नियम धाब्यावर बसवून होणार्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला सरकारने पायघड्या घालण्याच्या भूमिकेचा नेमका ‘अर्थ’ काय ? हिंदूंच्या सणांचा विरस करणारे सरकार सनबर्नवाल्यांच्या प्रचंड मोठ्या कायदाद्रोहाकडे डोळेझाक का करते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात