भाजपचे नेते दिलीप संघाणी यांचा अमूलच्या माजी अध्यक्षांवर आरोप
डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर घेतात, हीच खरी शोकांतिका आहे !
कर्णावती : भाजपचे नेते आणि माजी मंत्री दिलीप संघाणी यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात अग्रणी असलेल्या ‘अमूल’ या आस्थापनाचे माजी अध्यक्ष डॉ. वर्गीज कुरियन हे धर्मांतरासाठी कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. दिलीप संघाणी यांनी, ‘दुग्धक्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉ. वर्गीज कुरियन ‘अमूल’च्या पैशांतून ख्रिस्ती संस्थांना मिशनरी कार्य करण्यासाठी आर्थिक साहाय्य करत होते. अमूलच्या पैशांचा वापर ते धर्मांतरासाठी करत होते. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या प्रभावाखाली येऊन ती एक महान व्यक्ती असल्याचे चित्र उभे केले’, असा आरोप केला. डेअरीच्या एका कार्यक्रमात संघाणी यांनी कुरियन यांच्यावर हा आरोप केला. डॉ. कुरियन यांचे वर्ष २०१० मध्ये निधन झाले.
भारतात कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रात क्रांती आणणारे डॉ. वर्गीज कुरियन यांनी गुजरातच्या आनंद शहराला स्वतःची कर्मभूमी बनवली होती आणि तेथेच त्यांनी भारताच्या श्वेतक्रांतीचा पाया रचला. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना प्रथम पद्मभूषण आणि नंतर पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात