Menu Close

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात अंबाजोगाई, धाराशिव आणि तुळजापूर येथे निवेदन

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींची राष्ट्र-धर्म कार्यातील सहभागाची पहिली कौतुकास्पद कृती !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) : लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री केदारनाथ येथे काही वर्षांपूर्वी आलेल्या भयंकर प्रलयाविषयी खोटी कथा रचून श्री केदारनाथ मंदिराची विटंबना करणार्‍या ‘केदारनाथ’ या चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. उपविभागीय अधिकारी श्री. शिवकुमार स्वामी यांनी ते स्वीकारले. या वेळी अधिवक्ता श्री. अशोक मुंडे, सर्वश्री बालाजी भारजकर, आकाश चौरे, मयुर सूर्यवंशी, आेंकार भिसे, संदेश काळे, नवनाथ अप्रुपल्ले, ओम काळे, नागेश लोहारे, सौरभ नारायणकर, मंगेश बारस्कर, विनोद रसाळ आदी उपस्थित होते.

२ डिसेंबर या दिवशी येथे हिंदु राष्ट्र- जागृती सभा पार पडली. सभेनंतर ५ डिसेंबर या दिवशी मध्यवर्ती हनुमान मंदिर येथे झालेल्या धर्मप्रेमींच्या आढावा बैठकीला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. या बैठकीत धर्मप्रेमींनी राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी संघटित होण्याचा निश्‍चय करून ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात निवेदन देण्याचे निश्‍चित केले होते.

धाराशिव येथील ‘श्री’ चित्रपटगृहाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांचा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय !

धाराशिव : केदारनाथ चित्रपटाच्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन दिले. या वेळी अधिवक्ता गजानन चौगुले, श्री. अमित कदम, सर्वश्री परिक्षित साळुंखे, योगी खुंटाफळे, शिवसेनेचे श्री. बाळासाहेब काकडे, श्री. संतोष पिंपळे, श्री. मनोज काकडे आदी उपस्थित होते, तसेच येथील ‘श्री’ चित्रपटगृहाचे मालक श्री. जीवनराव गोरे यांनाही निवेदन देण्यात आले. त्या वेळी श्री. गोरे यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी संबंधितांना त्वरित आदेश दिले. (‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेणारे श्री. जीवनराव गोरे यांचे अभिनंदन ! अन्यत्रचे चित्रपटगृह मालक यातून बोध घेतील का ? – संपादक) 

तुळजापूर येथील चित्रपटगृह व्यवस्थापकांचा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय

तुळजापूर : ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात येथेही हिंदुत्वनिष्ठांनी जवाहर (थिएटर) चित्रपटगृहामध्ये निवेदन दिले होते. या वेळी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक अहमद यांनी ‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

केदारनाथ चित्रपटाच्या विरोधात पुणे येथे निवेदन

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात तळेगाव (जिल्हा पुणे) येथे नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सनातन प्रभातचे वाचक श्री. संतोष शिंदे, हिंदु जनजागृती समितीच्या सुनंदा येवले आणि रश्मी महाजन

भुसावळ (जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अभिजित नेने यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

जळगाव : ‘मी एक हिंदु असून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, असे कृत्य करण्यास संविधानाप्रमाणे बंदी आहे. असे असतांना ‘केदारनाथ’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असता या चित्रपटामुळे माझ्यासह असंख्य हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या असून या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी; कारण यामुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होऊ शकते’, अशा आशयाचे निवेदन भुसावळ (जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अभिजित नेने यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *