देहलीच्या रामलीला मैदानात विहिंपची धर्मसभा : न्यायालयाने लोकांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन
संघ परिवाराला अशा शब्दांत जाणीव करून द्यावी लागणेे, हे भाजप सरकारला लज्जास्पद ! स्वतःच्या पितृपरिवाराशी निगडित संघटनेचेही न ऐकणारे सरकार हिंदूंचे कधी ऐकेल का ?
नवी देहली : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले. राममंदिर उभारणीच्या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी देहलीतील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. या वेळी जगद्गुरु हंसदेवाचार्य महाराज, महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि, महामंडलेश्वर स्वामी ज्ञानानंद महाराज, साध्वी ऋतंभरा, संघनेते आलोक कुमार, विहिंपचे अध्यक्ष बी.एस्. कोकजे, उपाध्यक्ष चंपतराय आदी मान्यवर उपस्थित होते. या धर्मसभेत देशभरातील रामभक्त सहभागी झाले आहेत.
भैयाजी जोशी पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाने स्वतःची प्रतिष्ठा कायम राखावी आणि लोकांच्या भावनेचा आदर करायला हवा. वर्ष १९९२ मध्ये बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त झाला; मात्र राममंदिराचे काम अपूर्णच राहिले. ते पूर्ण होण्यासाठी सरकारने आता कायदा करावा. राममंदिर शांततेत झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. संघर्षच करायचा असता, तर आम्ही इतकी वर्षे थांबलो नसतो. आमचा कोणाशीही संघर्ष नाही; कारण केवळ रामराज्यच शांतता देऊ शकते. सत्तेत बसणार्या लोकांनी राममंदिर बांधण्याची घोषणा केली. आता हे आश्वासन पाळण्याची वेळ आली आहे. सरकारने सोडलेला संकल्प पूर्ण करायला हवा. सत्ताधार्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा. आम्ही भीक मागत नाही.’’
आक्रमणकर्त्यांच्या खुणा मिटवल्या पाहिजेत ! – जोशी
भैयाजी जोशी पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाची प्रतिष्ठा अबाधित रहायला हवी. ज्या देशात न्यायालयावरील विश्वास न्यून होतो, त्याचा विकास होणे अशक्य आहे. यासाठी न्यायालयानेही लोकांच्या भावनांचा आदर करायला हवा. देशावर आक्रमण करणार्यांच्या खुणा मिटवल्या पाहिजेत.’’
कडेकोट पोलीस बंदोबस्त
विहिंपच्या धर्मसभेसाठी ५ सहस्र पोलीस कर्मचारी, तसेच अर्धसैनिक बलाच्या १० तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत
राममंदिर उभारा अन्यथा पुढच्या वेळी सत्ता विसरा ! – स्वामी परमानंद यांची भाजपला रोखठोक चेतावणी
धर्मसभेला संबोधित करतांना स्वामी परमानंद म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करा अन्यथा पुढच्या वेळी सत्ता विसरा. आम्ही तुमची कळसूत्री बाहुली नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही.’’
आम्हाला केवळ संतांचेच नेतृत्व मान्य ! – चंपतराय
या वेळी विहिंपचे उपाध्यक्ष चंपतराय म्हणाले, ‘‘संपूर्ण रामजन्मभूमी हिंदूंची आहे. त्याचे त्रिभाजन आम्हाला मान्य नाही. ज्यांनी रामजन्मभूमीचा लढा देशभरातील ६ लाख गावांपर्यंत पोहोचवला, तसेच जे मागील ३२ वर्षांपासून अहोरात्र परिश्रम करत आहेत, अशा संतांचेच नेतृत्व आम्हाला राममंदिराच्या लढ्यासाठी मान्य आहे. आम्हाला अन्य कुठलेही नेतृत्व नको आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या घरात राममंदिराची जी प्रतिकृती आहे, तसेच राममंदिर अयोध्येत बनले पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात