Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आग्रेवाडी (ता. लांजा) येथे प्रथमोपचार शिबीर

भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी स्वत: प्रथमोपचार शिकून स्वावलंबी होणे, हे राष्ट्रीय कर्तव्य ! – डॉ.(सौ.) साधना जरळी

लांजा : येणारा भीषण आपत्काळ हा नैसर्गिक आपत्तींचा असणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:च्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात भाजणे, पोळणे, खरचटणे, कापणे, आग लागणे, अपघात झालेल्या ठिकाणी घायाळ (जखमी) व्यक्तींना साहाय्य करणे, अशा अनेक प्रसंगात आपल्याला प्रथमोपचाराची आवश्यकता भासते. युद्धकाळात राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नागरिक, सैनिक यांची जीवितहानी रोखण्यासाठी आपत्कालीन प्रथमोपचार पथके उभारून नक्कीच आपण या राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होऊ शकतो. आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या शिबिरातून विविध प्रथमोपचाराच्या पद्धती शिकून घेऊन इतरांना शिकवूया, असे आवाहन डॉ.(सौ.) साधना जरळी यांनी केले. येथील श्री गणेश मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रथमोपचार शिबिरात त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी मूलभूत जीवितरक्षण साहाय्य या विषयावर डॉ.(सौ.) साधना जरळी आणि अंतर्गत रक्तस्राव अन् प्रथमोपचार या विषयावर डॉ.(सौ.) गौरी याळगी आणि श्री. बापूसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा ७० जणांनी लाभ घेतला.

या शिबिरामध्ये मूलभूत जीवितरक्षण साहाय्य (Basic Life Support) च्या अंतर्गत हृदय-श्‍वसन पुनरुज्जीवन तंत्र (Cardio-Pulmonary Rususcitation) हे सर्व शिबिरार्थींना ‘डमी’वर प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. रुग्णाचे छातीदाबन करण्याचे तंत्र सर्व शिबिरार्थींनी उत्साहाने शिकून घेतले, तसेच रुग्ण तपासणी कशी करावी ? अंतर्गत रक्तस्राव आणि त्यावरील प्रथमोपचार, स्ट्रेचर सिद्ध करून रुग्णाला कसे वाहून न्यावे, याचेही प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. या शिबिराचे सूत्रसंचालन कु. श्रुती मांडवकर यांनी केले आणि शिबिराचा उद्देश श्री. विनोद गादीकर यांनी सांगितला.

या वेळी देवाच्या कृपेने आणि प्रथमोपचार वर्गात शिकल्याने घटना घडत असतांना साहाय्य करता आल्याची अनुभूती रत्नागिरी येथील श्री. बंडू चेचरे आणि लांजा येथील श्री. श्रीराम करंबेळे यांनी सांगितली.

अभिप्राय

१. डॉ. संतोष नाणोस्कर, रत्नागिरी –  वर्ग घेऊ शकतो असा आत्मविश्‍वास वाढला. रत्नागिरी येथे वर्ग चालू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार.

२. श्री. विनायक फाटक, देवरुख – या वर्गामुळे नेमकेपणाने कृती कशी करायची, हे शिकायला मिळाले.

३. श्री. मोहन बेडेकर, रत्नागिरी – प्रत्यक्ष प्रसंग घडतांना आपण बघ्याची भूमिका घेतो; मात्र यापुढे अशा प्रसंगी इतरांना साहाय्य करू, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला.

४. श्री. सुनील पाध्ये, नाटे – प्रथमोपचार शिकल्यामुळे कोणाचे प्राण वाचवू शकत नसलो, तरी देवाला जर आपल्याला माध्यम बनवायचे असेल, तर आपल्याकडून समाजऋण थोड्या प्रमाणात का होईना फेडले जाऊ शकेल.

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *