सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा न दिल्याने त्यांच्या हत्या होत आहेत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कर्नाटक
कुमटा (कर्नाटक) : अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत, अशी खंत व्यक्त करत हिंदूंचे नेते आणि कार्यकर्ते यांना योग्य ती सुरक्षा देण्याविषयी सरकारने लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी भटकळ येथील अधिवक्ता दत्तात्रेय नायक यांनी येथे आयोजित हिंदु अधिवेशनात व्यक्त केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलीकडेच कुमटा येथील श्री शांतिका परमेश्वरी देवस्थान येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करून वेदमंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ उद्योगपती श्री. गणपति जोगळेकर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सनातन संस्थेचे श्री. काशिनाथ प्रभुु यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून अधिवेशनास प्रारंभ झाला.
गोवंशाचे रक्षण करणे, हे धर्मकर्तव्य आहे ! – मंजुनाथ भट, श्री रामचंद्रपुर मठ, कुमटा
गोमातेचा केवळ कलियुगातच नव्हे, तर सत्ययुगापासून उल्लेख आहे; एवढेच नव्हे तर तिला पूजनीय स्थान देण्यात आले आहे. ब्रिटीश भारत सोडून गेले, तेव्हा देशात पुष्कळ मोठ्या प्रमाणात गोवंश होता. गायींच्या अनेक जाती प्रचलित होत्या. आता एकूणच गायींची संख्या अल्प झाली आहे. आज जर्सी (संकरित) गायीला अधिक महत्त्व दिले जात असून देशी गोवंशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे असेच चालू राहिले, तर भविष्यात लोकांना याची किंमत चुकवावी लागेल. त्यासाठी आपण देशी गायींचे आणि गोवंशाचे रक्षण संघटितपणे करणे अनिवार्य झाले आहे.
धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण झाले, तरच देशाचा विकास होईल ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था
आज सरकार आणि राजकीय पक्ष देश, तसेच राज्याची परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक योजना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भ्रष्टाचाराचे वाढलेले प्रमाण योजनांची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी अडथळा ठरत आहे. हिंदूंनी धर्म आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य न केल्यास अशा सामाजिक दुष्प्रवृत्तींमुळे देशाचा विकास कसा होऊ शकतो ?
हिंदु संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून कार्य करायचे आहे – गुरुप्रसाद गौडा
समाजात आज अनेक हिंदु संघटना राष्ट्ररक्षण तसेच धर्मकार्य करत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे ध्येय ठेवून लढा दिला, त्याच प्रमाणे प्रत्येक हिंदु संघटना तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी आपण सर्व हिंदु कार्यकर्त्यांनी धर्मकार्यासाठी तसेच राष्ट्ररक्षणाच्या कार्यासाठी प्रतिदिन वेळ देणे आवश्यक आहे.
सनातन पंचांग २०१९ च्या अँड्रॉईड आवृत्तीचे लोकार्पण
कुमटा येथे झालेल्या जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात सनातन पंचांग २०१९ च्या अँड्रॉईड आवृत्तीचे लोकार्पण श्री शांतिका परमेश्वरी देवस्थानाचे कार्यकारी प्रमुख श्री. कृष्णा बाबा पै यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय ! – श्रीकृष्ण बाबा पै, कार्यकारी प्रमुख, श्री शांतिका परमेश्वरी देवस्थान, कुमटा
गेल्या काही वर्षांपासून मला हिंदु जनजागृती समितीचे कार्य परिचित आहे. समिती अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून धर्मरक्षण, तसेच राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहे. समाजाला धर्माचरणाकडे आणि राष्ट्राच्या उन्नतीकडे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहेत. आज ते हिंदु समाजाला आणिधर्मप्रेमींना हिंदू राष्ट्राच्या कार्यात जोडत असलेले पाहून पुष्कळ आनंद झाला. असे कार्य अधिक मोठ्या स्तरावर करण्यास माझे सहकार्य असेल.