Menu Close

उल्हासनगर (ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालूच !

  • हिंदूबहुल देशात हिंदूंचे असे उघडपणे धर्मांतर होणे, हा आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचाच गंभीर परिणाम आहे ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • ज्या सिंधी समाजाने अखंड हिंदुस्थानाच्या विभाजनाच्या वेळी हिंदु धर्म टिकावा, यासाठी पाकिस्तानमधील स्वत:ची भूमी, संपत्ती आणि सर्वस्व यांचा त्याग केला, तो सिंधी समाज ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या प्रलोभनाला बळी पडत असून उच्चभ्रू सिंधीवर्ग अक्षरश: मिशनर्‍यांचा प्रचार करू लागला आहे, अशी दुर्दैवाची स्थिती ओढवली आहे.
  • उल्हासनगर येथील धर्मांतराच्या कारवाया रोखणे आता स्थानिक हिंदूंच्या हाताबाहेर गेले असून ही स्थिती अशीच चालू राहिल्यास काही वर्षांत येथील सिंधी आणि पर्यायाने हिंदू नामशेष होऊन उल्हासनगर हे महाराष्ट्रातील पहिले ख्रिस्ती शहर म्हणून घोषित व्हायला वेळ लागणार नाही !

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हा ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराचा अड्डा बनला असून मागील ५-६ वर्षांत येथील लक्षावधी हिंदूंचे कटकारस्थान करून धर्मांतर करण्यात आले आहे. येथे बहुसंख्य असलेल्या सिंधी समाजाला मिशनर्‍यांनी लक्ष्य केले असून मागील ५-६ वर्षांत २८ सहस्र कुटुंबांतील दीड लाखांहून अधिक सिंधी लोकांचे धर्मांतर करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक सिंधी संघटना आणि प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. सिंधी समाजाचे धर्मांतर हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर येथे जागेचे दर पुष्कळ अधिक असतांना या परिसरात १८ भव्य चर्च उभारण्यात आली आहेत. शहरात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी इतके जाळे निर्माण केले आहे की, या परिसरात एकूण २५ हून अधिक छोटी-मोठी चर्च आणि १०० हून अधिक प्रार्थनास्थळे उभारण्यात आली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. प्रत्यक्षात ‘गुगल’वर शोधले असता या परिसरात १७ चर्चची नावे उपलब्ध झाली.

वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी धर्मांतर होऊ नये, यासाठी सिंधी समाज भारतात आला. उल्हासनगर येथे वसलेल्या या सिंधी समाजाचे मागील काही वर्षांपासून अत्यंत नियोजनबद्ध आणि छुप्या पद्धतीने ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतर करण्यात येत आहे. याविषयी येथील पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. सत्यम पुरी यांनी ‘आज उल्हासनगर शहरातील बहुतांश कुटुंबातील एकतरी व्यक्ती ख्रिस्ती झाली आहे’, हे भयाण  वास्तव सांगितले.

१. धर्मांतरित झालेले सिंधी लोक समाजबांधवांना धर्मांतरित होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. येथील जे व्यापारी आणि त्यांचा परिवार ख्रिस्ती झाले आहेत, ते त्यांचा फ्लॅट, जागा चर्चसाठी, तसेच त्यांच्या गाड्या ख्रिस्ती मिशनर्‍यांना प्रचारासाठी उपलब्ध करून देत आहेत, हे वास्तव अनेक जणांनी सांगितले.

२. धर्मांतरित झालेला सिंधी समाजातील व्यापारीवर्ग आणि उच्चभ्रू सिंधी त्यांचे नातेवाईक आणि समाजबांधव यांना धर्मांतरासाठी प्रोत्साहित करत आहेत.

३. स्थानिक हिंदू हे धर्मांतराच्या कारवायांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देत असून त्यांचे प्रयत्न थिटे पडत आहेत.

धर्मांतरित सिंधी स्वतःचे नाव न पालटता सिंधी मुलींशी विवाह करून करत आहेत फसवणूक !

सिंधी समाजात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत न्यून आहे. ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या सिंधी युवकांशी ख्रिस्ती युवती लग्नासाठी सिद्ध होत नाहीत. त्यामुळे ‘ख्रिश्‍चन प्रीस्ट’ धर्मांतरित सिंधी युवकांना त्यांचे पूर्वीचेच नाव ठेवायला सांगतात. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करणार्‍या सिंधी युवतींना लग्नानंतर पतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे कळते. त्यानंतर धर्मांतरित ख्रिस्ती युवक स्वतःच्या पत्नीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकतात. असे प्रकार घरोघरी घडत असल्याचे श्री. सत्यम पुरी यांनी सांगितले.

भंपक चमत्कार सांगून करण्यात येते धर्मांतर !

उल्हासनगर येथून जवळच ‘ताबोर आश्रम’ म्हणून ख्रिस्ती संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आश्रम या नावाने हे धर्मांतराचे मोठे केंद्र बनले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम नेहमीच चालू असतात. अशा कार्यक्रमांमध्ये ‘लंगडा चालायला लागेल, आंधळ्याला दिसू लागेल, यासाठी येशूला शरण या’, अशी वाक्ये असलेली भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावलेली पहायला मिळतात (अंनिसवाल्यांना हे दिसत नाही कि त्यांना ख्रिस्त्यांविषयी बोलयचे नाही ? – संपादक); मात्र अशा अंधश्रद्धा पसरवणार्‍या कार्यक्रमांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. विविध वृत्तवाहिन्यांवरून या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण चालू असते.

धर्मांतरित श्रीमंतांद्वारे आदिवासी भागांत धर्मांतर करण्याचा मिशनर्‍यांचा डाव !

मिशनर्‍यांकडून श्रीमंत सिंधी लोकांचे धर्मांतर करून त्यांना येथील आजूबाजूच्या गावांतील आदिवासी आणि गरीब वर्गाचे धर्मांतर करण्यासाठी पाठवण्यात येते. उल्हासनगर येथील श्रीमंत लोकांनी धर्मपरिवर्तन केले असल्याचा दाखला देऊन धर्मांतरीत सिंधी लोक गरीब लोकांना धर्मांतरित करतात.

धर्मांतराला विरोध करणार्‍यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे !

येथील एका वसाहतीत धर्मांतर चालू असतांना तेथील स्थानिक हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध केला; मात्र ख्रिस्ती लोकांनी ‘हिंदूंनी कार्यक्रम उधळला, शिवीगाळ केली’, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवून हिंदूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

धर्मांतराच्या या गंभीर समस्येच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना वैध मार्गाने विरोध करत आहेत. धर्मांतराच्या कार्यक्रमाविषयी पोलिसांत तक्रार करणे, ज्या ठिकाणी हे कार्यक्रम चालतात, त्या ठिकाणच्या मालकांचे प्रबोधन करणे, असे प्रयत्न स्थानिक हिंदुत्वनिष्ठांकडून चालू आहेत; मात्र त्याला न जुमानता या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार चालूच आहेत. आज या समस्येने अतिशय गंभीर रूप धारण केले आहे.

उल्हासनगर परिसरातील चर्चची सूची

१. न्यू लाईफ फॉलोशीप चर्च, मनेरागाव, २. सेंट जेम्स मर थोमा चर्च, अशोकनगर ३. बेथेल चर्च, सत्नाम सखी अर्पाटमेंट, अशोकनगर, ४. सेंट थॉमस इवँजेकल चर्च ऑफ इंडिया, कांसस रोड, ५. सेंट जोसेफ मलंकारा कॅथोलिक चर्च, अशोकनगर, ६. सेंट अ‍ॅन्थोनी चॅपेल चर्च, रामायणनगर, ७. मेथोडीस्ट मराठी चर्च, अशोकनगर, ८. महानेह डॅन फॉलोेशीप चर्च, सुभाष टेकडी, ९. द सॅलवेशन आर्मी चर्च, कैलास कॉलनी, १०. सेंट मेरी ऑर्थोडॉक्स चर्च, अशोकनगर, ११. चर्च ऑफ नाझरेना, अशोकनगर, १२. जीझस इज लाईफ चर्च, कल्याण-अंबरनाथ रोड, बंधन बँकेजवळ, १३. किंग ऑफ शालेम चर्च, कुर्ला कॅम्प, १४. मिरॅकल चर्च, कुर्ला कॅम्प रोड, १५. सेंट जोसेफ चर्च, अशोकनगर १६. सेंट पाऊल्स कॅथोलिक चर्च, अशोकनगर, १७. चर्च, उल्हासनगर स्कायवॉक ३, रामायणनगर

ख्रिस्त्यांनी वाटलेली पत्रके

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *