पोलिसांच्या दबावतंत्राला न जुमानता धारकर्यांनी लावला अफझलखानवधाचा फलक !
कल्याण : येथील पूर्वेतील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात १४ डिसेंबरला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन’ सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पोलिसांनी अफझलखानवधाचा फलक न लावण्यासाठी दबाव आणूनही धारकरी त्याला नमले नाहीत.
भगव्या ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. नंतर आई तुळजाभवानीचा गोंधळ, देशभक्तीपर गीते, पोवाडा, प्रतापगडचा रणसंग्राम (नाट्य) आणि शूर सरदारांच्या वंशजांचा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार अधिवक्त्या सौ. सुधा जोशी यांना, तर वीर जीवा महाले पुरस्कार दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अनुमाने ८०० धर्माभिमानी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमात टाळ्या न वाजवता धारकरी ‘श्रीराम’ आणि ‘शिवाजी महाराज’ यांच्या घोषणा देत होते.
२. या वेळी गोपनीय विभागाच्या पोलिसांनी सनातन प्रभातच्या वार्ताहराकडे या कार्यक्रमाचे चित्रीकरण देण्याविषयी विचारणा केली.
३. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
४. सभेच्या ठिकाणी २५ फूट उंचीचा भव्य भगवा ध्वज उभारण्यात आला होता.
५. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनास उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस आल्यावर त्यांनी कार्यक्रमाच्या मंचावर लावलेला अफझलखानवधाचा फ्लेक्स धारकर्यांवर दबाव आणत काढण्यासाठी सांगितले. त्या वेळी धारकरी श्री. मयुरेश धुमाळ यांनी त्यांच्या दबावाला न जुमानता फ्लेक्स न काढण्याची ठाम भूमिका घेऊन कार्यक्रम पुढे चालू ठेवला.
श्री शिवप्रतापदिनाचा हा कार्यक्रमस्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस येऊन म्हणाले, ‘‘असे काही तुम्ही करणार असे सांगितले नाही. तुम्हाला अशा कार्यक्रमासाठी अनुमती दिली का ? अफझलखानाच्या या फ्लेक्समुळे सांगलीत दंगल घडली हे तुम्हाला माहीत नाही का ? तो फ्लेक्स तात्काळ काढा.’’ त्या वेळी सर्व धारकर्यांनी ‘‘साहेब, आम्ही योग्य आणि सत्य इतिहास दाखवत आहोत’’, असे सांगितले. त्यावर एक पोलीस दम देत म्हणाले, ‘‘आम्हीही तोच इतिहास शिकलो आहोत; पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या, तर तुम्हीच त्याला कारणीभूत ठराल.’’ त्यावर ‘‘हा हिंदुबहुल विभाग आहे, आमच्या भावना नाहीत का ?’’, असा उपप्रश्न श्री. मयुरेश धुमाळ यांनी विचारताच पोलीस निरुत्तर झाले. (असे धारकरीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात