हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजी गोपीनाथ बोकील पुरस्कार घोषित
पुणे : समस्त हिंदु आघाडीच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या औचित्याने नातूबाग मैदान येथे आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी यांना हिंदवी स्वराज्य भूषण वीर जीवा महाले पुरस्कार आणि शिवसेनेचे संभाजीनगर येथील नगरसेवक श्री. राजेंद्र जवंजाळ यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार देण्यात आला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजी गोपीनाथ बोकील पुरस्कार घोषित करण्यात आला; परंतु काही व्यस्ततेमुळे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, शिवसेनेचे श्री. रमेश कोंडे, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
उत्सवाच्या प्रारंभी शिवशाहीर अशोक कामठे यांनी अफझलखानवधाचा पोवाडा सादर केला. त्यानंतर व्यासपिठावरील अफझलखानवधाच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी सर्व युवकांनी जल्लोष करत घोषणा दिल्या. त्यानंतर मारुतीस्तोत्र म्हणून मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला. निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते सर्व पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी आभारप्रदर्शन केले आणि शिववंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
युवकांनो, सुशिक्षित ‘अंगठे बहाद्दर’ होण्याऐवजी देशसेवा करा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक
आजचे युवक-युवती भ्रमणभाष वापरत सुशिक्षित ‘अंगठे बहाद्दर’ झाले आहेत. देशामध्ये दीपिका-रणवीर, इशा अंबानी आणि प्रियांका-निक यांची लग्ने म्हणजे ३ राष्ट्रीय कार्ये झाली आहेत. देशाप्रती कार्य करण्याची आंतरिक इच्छा, तळमळ ही केवळ सैनिकांच्या नावावर लिहून ठेवायची का ? हक्क मागत असतांना आपली कर्तव्येही असतात त्याची जाणीव ठेवायला हवी. हे सर्व करण्याऐवजी देशसेवेसाठी प्रयत्न करा. कुठे गेले ते तरुण रक्त, जे देशाच्या उपयोगी यायला हवे होते ? स्वार्थ जोपासणार्यांच्या मनात अफझलखानवधाचे चित्र लावण्यासाठी कालवाकालव होत असते. देशासमोर छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत कि अफझलखान ? आपले ध्येय गुलामी नसेल, तर आपल्या आतील गुलामी म्हणजेच इंग्रजी भाषा, पाश्चिमात्य संस्कृती काढून टाका. तेेव्हा आपण स्वतंत्र होऊ.
जिंकायचे असेल, तर आक्रमकता आवश्यक – निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले
आपल्याला जिंकायचे असेल, तर आपल्यामध्ये आक्रमकता असायला हवी. वर्ष २०२० मध्ये भारत हा जगामध्ये सर्वांत तरुण देश होईल. सर्व युवकांनी स्वतःची प्रतिमा सिद्ध करत समाजासमोर आदर्श निर्माण करायला हवा. १३ दिवसांत आपण १९७१ चे युद्ध जिंकले. त्यानंतर परत येतांना कुठेही लूटमार, बलात्काराच्या घटना घडल्या नाहीत; कारण ही भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती सैन्य दलानेही जोपासली आहे. भारतीय लोक परदेशात भेटले, तर आपले पारपत्र लपवतात. आपण भारतीय आहोत हे निधड्या छातीने सांगायला हवे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात