दलीत पँथर आणि भीम आर्मी या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न
मुंबई : हिंदु समाजामध्ये हिंदुत्व निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सर्वांना आदर, अभिमान, प्रेम आहे; मात्र पालक त्यांच्या मुलांना शिवचरित्र वाचायला देत नाहीत. तसेच कुणीही शिवचरित्र विकत घेऊन वाचत नाही. प्रखर हिंदुत्वासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ‘३२ मण सुवर्ण सिंहासन, खडा पहारा आणि गडकोट मोहीम’ या विषयावर १६ डिसेंबर या दिवशी शिवडी (मुंबई) येथील सार्वजनिक भाषणात पू. भिडेगुरुजी यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या वेळी दलीत पँथर आणि भीम आर्मी यांच्या कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना कह्यात घेतले. विरोधानंतरही ही सभा यशस्वीरित्या पार पाडली. (हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्व जागृत करण्याचे सेवाव्रत आचरणारे पू. भिडेगुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करणे म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनाच विरोध करण्यासारखे आहे. यातून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकियांशी अधिक लढाया का लढाव्या लागल्या, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. महाराष्ट्राची लोकसंख्या काही कोटींच्या घरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. त्याच्या प्रतींची संख्या मात्र काही सहस्त्र आहे. हे प्रमाण अल्प आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिवचरित्र शिकवायला द्यावे.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांना परकियांपेक्षा स्वकियांशी अधिक लढाया लढाव्या लागल्या, हे हिंदूंचे दुर्दैव आहे.
३. लोक पंढरपूरला विठ्ठलाकडे जाऊन व्यावहारिक गोष्टी मागतात; परंतु विठ्ठलाच्या पायाशी राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही मागत नाहीत. आज ती वेळ आली आहे. या वेळी पू. भिडेगुरुजींनी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन उभारण्याचे आवाहन केल्यावर उपस्थित शेकडो धारकर्यांनी हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.
सभेला विरोध करणार्यांचा फज्जा !
हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी भीम आर्मी आणि दलित युथ पँथर यांनी कार्यक्रम उधळून लावण्याची वल्गना केली होती. प्रत्यक्षात या संघटना आणि भारिप बहुजन आघाडी यांच्या जेमतेम ८ ते १० कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी केली. कार्यक्रम उधळून लावण्याची वल्गना करणार्या या संघटनांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते आल्यामुळे विरोधकांच्या विरोधाचा पुरता फज्जा उडाला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांनी पू. भिडेगुरुजींचा एकेरी नावाने उल्लेख करून मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि कोरेगाव भीमा दंगलीला पू. गुरुजी उत्तरदायी असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली.
(पू. भिडेगुरुजी यांच्यासारख्या वयोवृद्ध आणि तपोवृद्ध व्यक्तीचा एकेरी नावाने उल्लेख करणार्यांची संस्कृती काय, हे यातून दिसून येते. कोरेगाव भीमा दंगल घडवण्यासाठी आणि एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांकडून अर्थसाहाय्य करण्यात आल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले आहे. असे असतांना त्याविरोधात कोणताही आवाज न उठवता केवळ हिंदुद्वेषातून पू. भिडेगुरुजी यांना विरोध करणार्यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. हा कार्यक्रम रहित करण्यात यावा, यासाठी दोन्ही संघटनांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. विरोधाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस सर्वांची पडताळणी करून मगच कार्यक्रमस्थळी पाठवत होते. कार्यक्रमाला संभाव्य विरोध लक्षात घेऊन श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरीही सतर्कता बाळगून होते.
अशा विरोधाला आम्ही भीक घालत नाही ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगायला जे विरोध करत आहेत, त्यांना आम्ही योग्य उत्तर देऊ. जे नेते गुरूजींवर आरोप करत आहेत, त्यांनी त्याविषयी एकही पुरावा दिलेला नाही. केवळ बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. आरोप करणार्यांनी एकही पुरावा न्यायालय अथवा प्रसिद्धीमाध्यमे यांपुढे ठेवलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी तर चौकशी आयोगापुढे गुरूजींचे नावही घेतलेले नाही. जाणीवपूर्वक जो असा प्रयत्न करत आहे, तो आम्ही ठेचून काढू. अशा विरोधाला आम्ही भीक घालत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात