योग्य निर्णय घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन !
भाषा बंधनकारक करणार !
मुंबई : महाराष्ट्रातील केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येणार असून त्यासाठी विधीमंडळ सदस्यांचा ठराव या अधिवेशनात करण्यात येईल आणि तो केंद्राकडे पाठवण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात स्पष्ट केले. श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस्.ई आणि सी.बी.एस्.ई., आय.जी.सी.एस्.ई., आय.बी. या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवण्याची अट या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देतांना नमूद करणार आहोत. तसेच यापुढे या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देतांना या शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा बंधनकारक करण्यात येईल.
श्री. तावडे पुढे म्हणाले, मुंबई शहर आणि आणि उपनगरे येथील नर्सरी चालकांकडून भरमसाठ शुल्क आकारले जाते. पालकांची आर्थिक लुटमार होत असल्याच्या तक्रारी आहेत; मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण हे शासनाच्या थेट नियंत्रणाखाली नाही. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी या सदंर्भात एक अहवाल राज्यशासनाला सादर केला आहे. राज्यातील शाळांमधील नर्सरी प्रवेशासाठी शासनाने धोरण आखण्याविषयीचा प्रश्न विधानसभेत अधिवक्ता यशोमती ठाकूर, अमिन पटेल आदी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना श्री. तावडे बोलत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात