रत्नागिरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी
रत्नागिरी : शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि अन्य मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरातील जयस्तंभ येथे निदर्शने केली होती.
हिंदूंच्या श्रद्धांचा सन्मान व्हायलाच हवा ! – प्रसाद म्हैसकर, हिंदु जनजागृती समिती
केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात भगवान अय्यप्पा यांच्या लक्षावधी भक्तांनी मंदिराच्या परंपरा रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी वैध मार्गाने निषेध नोंदवला. या आंदोनलकर्त्या भक्तांवरही गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनकर्त्या भक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावे, तसेच केवळ शबरीमालाच नव्हे, तर ज्या ठिकाणी हिंदूंच्या श्रद्धा आहेत, त्या ठिकाणी शासन किंवा न्यायालय यांनी हस्तक्षेप करू नये, असा कायदा संसदेत पारित करण्याची आवश्यकता आहे. बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या देशात हिंदूंच्या श्रद्धांचा सन्मान व्हायलाच हवा.
२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती
नाताळ आणि नवीन वर्षासाठी रात्री ११.५५ ते १२.३० या वेळेत फटाके फोडण्यास अनुमती दिली आहे. भारतात २० टक्के जतनेला दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी नाही, कुपोषणे, जनतेची निरक्षरता आणि अनेकांना औषधोपचाराचीही सोय नाही. अशा स्थितीत नागरिकांनी फटाके उडवणे योग्य नाही. फटाके उडवणे हा पैशांचा अपव्यय होय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत २५ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी.
सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – परेश गुजराथी, सनातन संस्था
पुरोगाम्यांच्या हत्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचाच हात आहे, असे गृहीत धरून सर्व अन्वेषण चालू आहे. यामुळे सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांना नाहक गोवून अधिकाधिक पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे. यामुळे आम्ही अशी मागणी करतो की, न्यायालयात खटले लवकर चालवावेत आणि सत्य समोर आणावे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याविषयी अनाठायी मागण्या होत आहेत. जर अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा. सातत्याने खोटी वृत्त देऊन सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु गोवंश रक्षा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, श्रीराम सेना आदी संघटनांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रसिद्धीमाध्यमांद्वारे नाहक अपकीर्ती केली जात आहे. खटला बारगळवून हिंदुत्वनिष्ठांना नाहक कारावास भोगावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालात व्हावी आणि ज्या अधिकार्यांनी ही सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी.
‘सनबर्न’ फेस्टिव्हल गोव्यातील जनतेप्रमाणे केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर भारतातून कायमचा हद्दपार करावा ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती
आपल्या धर्मावरील आणि संस्कृतीवरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे पुणे येथील ‘सनबर्न फेस्टिवल’. यामुळे भारतीय युवापिढी दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला पर्यटनवाढ करायचीच असेल, तर विदेशी पर्यटक भारतीय संस्कृतीशी जोडले जातील, अशा अनेक कलाकृती राज्यात आणि देशात आहेत. त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देऊन पर्यटनवाढ करावी; मात्र पाश्चात्त्य विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि भारतीय युवापिढीला अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे ‘सनबर्न’ फेस्टिव्हल गोव्यातील जनतेप्रमाणे केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर भारतातून कायमचे हद्दपार करून सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी मागणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत.
या आंदोलनाच्या वेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश मयेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुशील कदम, शिवस्मृती मंडळचे खजिनदार श्री. अविनाश पाटणकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. बापूसाहेब पाटील हे उपस्थित होते. रणरागिणी शाखेच्या सौ. माधवी गुडेकर यांनीही या वेळी विचार मांडले. या आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. महेश लाड यांनी केले.
रत्नागिरी येथे आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, श्री. विनोद गादीकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश मयेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुशील कदम, शिवस्मृती मंडळचे खजिनदार श्री. अविनाश पाटणकर आणि श्री. हृषिकेश गुरव हे उपस्थित होते.