पनवेल : येथील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये, तसेच नवीन आणि जुने पनवेल येथेही प्रसाराला आरंभ करण्यात आला आहे. या प्रसाराला धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांचा प्रतिसाद वाढता आहे. सभेच्या निमित्ताने ३० हून अधिक गावांमध्ये धर्मप्रसार करण्यात येत आहे. सभेसाठी निमंत्रणे देऊन हिंदु राष्ट्र-जागृती सभेची आवश्यकता का आहे, हिंदूंनी संघटित होणे कसे आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या प्रसाराला येथील गावकर्यांकडून चांगला प्रतिसाद आणि सभेसाठी साहाय्य मिळत आहे. शहर आणि गावात आतापर्यंत २८ हून अधिक बैठका झाल्या असून त्या माध्यमातून ४०० हून अधिक लोकांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, योगवर्ग, महिला मंडळे आदी ठिकाणीही सभेचा विषय मांडण्यात आला असून याद्वारे १ सहस्रांहून अधिक जणांपर्यंत पोहोचता आले आहे. अनेक ठिकाणी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
- रसायनी येथील सावळा गावात एका तरुणाने २५ ते ३० तरुणांना विषयी समजून घेण्यासाठी संघटित केले. त्यांने स्वत: पुढाकार घेऊन ‘सभेचा प्रसार करणारी १ सहस्र हस्तपत्रके द्या, आम्ही वाटू’, असे सांगून धर्मकार्यात सहभाग नोंदवला.
- शिरढोण गावामध्ये तरुणांनी पुढाकार घेऊन प्रभात फेरी काढण्याचे ठरवले आहे. त्यांनी ‘आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची क्रांतीज्योत’ घेऊन सभेत येऊ’, असेही सांगितले.
- कोण गावच्या सरपंचांनी ‘गावकर्यांचे प्रबोधन करून गावकर्यांना आणतो’, असे आश्वासन दिले. अशा प्रकारच्या सभांची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया अनेक गावकर्यांनी व्यक्त केली.
- काही रिक्शाचालक संघटनांनी सभेची भित्तीपत्रके रिक्शांवर लावण्याची सिद्धता दर्शवली आहे. विश्व हिंदु परिषदेच्या विराट धर्मसभेतही हिंदु राष्ट्र-जागृती सभेत येण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सामाजिक प्रसारमाध्यमांतून सहस्रो लोकांपर्यंत सभेचा प्रचार पोहोचला आहे.