nमुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला ‘दलित’, भाजपचे उत्तरप्रदेशातील आमदार बुक्कल नवाब यांनी महाबली हनुमानास ‘मुसलमान’, त्यांचेच एक धर्मांध कार्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी ‘जाट’, समाजवादी पार्टीचे आमदार शतरुद्र प्रकाश यांनी ‘वनवासी’, बागपतच्या आमदारांनी ‘आर्य’, भाजपचे खासदार हरी ओम पांडे ‘ब्राह्मण’, उदित राज या खासदारांनी ‘आदिवासी’, जैन आचार्य निर्भय सागर यांनी ‘जैन’, तर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचेच खासदार कीर्ती आझाद यांनी ‘चिनी’ असल्याचे सांगितले. महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच चालू आहे; मात्र तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे गप्पच आहेत. हेच जर मुस्लिम किंवा पुरोगामी मंडळींनी केले असते, तर याच हिंदुत्वनिष्ठांनी त्याविरुद्ध प्रचंड गदारोळ केला असता, असे परखड मत सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधायचे राहिले बाजूला, पण भारतीय जनता पक्षात रामभक्त हनुमानाच्या जातीवरून पंचायत चालू झाली आहे. भक्ती आणि निष्ठा यांचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. ‘जिथे राम तिथे हनुमान’, हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे त्याची जात कोणती आणि धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला ? भगवान श्रीरामाप्रती निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. हनुमानाचे सारे जीवन राममय होते. हनुमानाने रामासाठी त्याग आणि युद्ध केले. संकटाच्या वेळी हनुमान रामाच्या पुढेच उभे राहिले. हनुमान आणि त्यांची सेना नसती तर रामाचे वनवासी जीवन बेचव, अर्थशून्य झाले असते. असंग आणि अधर्माचा पराभव करण्यासाठी हनुमान प्रभु श्रीरामांचे उजवे हात झाले. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तरप्रदेश विधानसभेत कोणी नवे रामायण लिहीत असेल, तर या नव्या रामकथेस आवर घाला, असेही यात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात