‘वर्ष २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील २ कोटी २५ लाख नागरिकांना आरोग्याशी संबंधित ९७१ प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांकरता दीड लक्ष रुपयांचा विमा लाभ देण्याच्या उद्देशाने ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित केली. शासनाने, या ‘कॅशलेस’ विमा योजनेच्या अंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध जिल्ह्यांतील काही रुग्णालये संलग्न (empanelment) केली.
संलग्न रुग्णालयांनी २५ टक्के ‘बेड्स’ या योजनेतील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असतांनाही काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी अन्य रुग्णांना ठेवल्याची तक्रार प्राप्त झाल्याने त्या रुग्णालयांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.
वर्ष २०१२ पासून आतापर्यंत रुग्णांकडून पैसे घेणे, देयके अधिक दाखवणे, वैद्यकीय अहवाल आणि कागदपत्रांत फेरफार करणे इत्यादी कारणांसाठी महाराष्ट्र शासनाने २३९ रुग्णालयांना या योजनेतून वगळले आहे. यामध्ये, अहमदनगर (१६), अकोला (१०), अमरावती (४), संभाजीनगर (१४), बीड (२), चंद्रपूर (७), हिंगोली (२), जळगाव (६), जालना (४), कोल्हापूर (१६), लातूर (८), मुंबई आणि उपनगरे (२०), नागपूर (२३), नांदेड (४), नाशिक (१३), परभणी (६), पुणे (१५), रायगड (६), सांगली (६), सातारा (१३), सोलापूर (९), ठाणे (१८), वाशिम (६) आणि यवतमाळ (३) या जिल्ह्यांतील रुग्णालयांचा समावेश आहे. भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धाराशिव आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका रुग्णालयाला या योजनेतून वगळले आहे.
शासनाची गरीब आणि गरजू रुग्णांविषयी असलेली अक्षम्य असंवेदनशीलता आणि अनास्था !
अनियमितता करणार्या या रुग्णालयांच्या विरोधात शासनाचे धोरण अत्यंत बोटचेपे आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार्या या रुग्णालयांच्या विरोधात शासनाने अत्यंत कठोर भूमिका घेणे आवश्यक असतांना, त्यांना केवळ निलंबनाची नोटीस देऊन या योजनेतून वगळले आहे.
ज्या रुग्णालयांनी अनियमितता करून अधिक पैसे घेतले असतील, त्यांच्याकडून ते वसूल करून रुग्णांना पुन्हा मिळवून देणे, त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, हे शासनाचे दायित्व आहे. असे असतांनाही केवळ रुग्णालयाचे नाव योजनेतून वगळणे, ही शासनाची गरीब आणि गरजू रुग्णांविषयी असलेली अक्षम्य असंवेदनशीलता आणि अनास्था आहे.’
इतर राज्यांतही अशी योजना आणि अशा फसवणुकी होत असल्यास त्यांची माहिती पुढील पत्त्यावर कळवा
पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : aarogya [dot] sahayata [at] gmail [dot] com