विश्व अग्निहोत्र दिनाच्या निमित्ताने…
१२ मार्च हा विश्व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो. पुढे होणार्या संभाव्य तिसर्या महायुद्धात महासंहारक अण्वस्त्रे वापरली जातील. स्थुलापेक्षा सूक्ष्म अनेक पटीने प्रभावी असल्याने अणवस्त्रे, अणूबाँब यांसारख्या संहारकांना नष्ट करण्यासाठी सूक्ष्मातील उपाय उपयुक्त ठरू शकतात. या उपायांपैकीच एक म्हणजे ऋषीमुनींनींच्या यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ !
अग्निहोत्राचे लाभ
जगातील अग्निहोत्राचे आचरण करणारे भिन्न वंश, भिन्न भाषा, भिन्न धर्म आणि आध्यात्मिक असे गट आहेत.
१. चैतन्यप्रदायी आणि औषधी वातावरण निर्माण होते.
२. अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकणे : अग्निहोत्रामुळे वनस्पतींना वातावरणातून पोषणद्रव्ये मिळतात आणि त्या सुखावतात. अग्निहोत्राच्या भस्माचाही शेती आणि वनस्पती यांच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य, फळे, फुले अन् भाजीपाला पिकतो.
३. प्राणीजीवनाचे पोषण : ज्याप्रमाणे अग्निहोत्र वनस्पतीचे पोषण करते, तद्वत् मनुष्य आणि समस्त प्राणीजीवन यांचेही पोषण करते.
४. अग्निहोत्राच्या वातावरणाचा बालकांवर सुपरिणाम होणे
- मुलांच्या मनावर उत्तम परिणाम होऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतात.
- चिडचिडी, हट्टी मुले शांत आणि समंजस होतात.
- मुलांना अभ्यासात एकाग्रता सहज साधता येते.
- मतिमंद मुले त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना अधिक उत्तम प्रतिसाद देतात.
५. अग्निहोत्राने दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होऊन मनोविकार बरे होणे आणि मानसिक बल प्राप्त होणे : नियमाने अग्निहोत्र करणार्या विविध स्तरांतील स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध यांमध्ये एकमुखाने अधिक समाधान, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, मनःशांती, आत्मविश्वास आणि अधिक कार्यप्रवणता हे गुण निर्माण होऊन वाढीस लागल्याचे अनुभवास आले. दारू आणि इतर घातक मादक पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्ती अग्निहोत्राच्या वातावरणात त्या व्यसनांपासून मुक्त होऊ शकतात; कारण त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होते, असे आढळून आले आहे.
६. मज्जासंस्थेवर परिणाम : ज्वलनातून निघणार्या धुराचा मेंदू आणि मज्जासंस्था यांवर प्रभावी परिणाम होतो.
७. रोगजंतूंचे निरोधन : अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, असे काही संशोधकांना आढळून आले.
८. संरक्षककवच निर्माण होणे : एक प्रकारचे संरक्षककवच सभोवती असल्याची जाणीव होते.
९. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध होऊन त्या वातावरणातील व्यक्तींचे मन त्वरित प्रसन्न आणि आनंदी होणे अन् त्या वातावरणात ध्यानधारणा सहज साध्य होणे : प्राण आणि आपले मन एकमेकांशी घट्टपणे निगडित असून जणूकाही ती एकाच नाण्याची दोन अंगे आहेत, असेही म्हणता येईल. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध झाल्याचा इष्ट परिणाम त्या वातावरणात असलेल्या व्यक्तीच्या मनावर त्वरित होऊन तिला तणाव विनासायास नष्ट होऊन मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याचा अनुभव येतो. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते.
– डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’)