पंढरपूर : शिवसेनेची राममंदिराविषयीची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिर उभारण्याचे दायित्व आपल्या खांद्यावर घेतले आहे. त्यामुळे मंदिराचे काय करायचे ते देशातील तमाम हिंदु बांधवांच्या साहाय्याने आता आम्ही पाहू. त्यामुळे श्रीराम, हनुमान यांच्याविषयी, तसेच राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना आता अधिकार नाही, अशी टीका खासदार श्री. संजय राऊत यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २४ डिसेंबर या दिवशी येथे होणार्या जाहीर सभेच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी खासदार राऊत येथे आले होते. तेव्हा पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘प्रभु रामचंद्रांचे भक्त असलेल्या हनुमानाची मोगलांनीही इतकी विटंबना केली नाही, तितकी विटंबना भाजप नेत्यांकडून केली जात आहे. एक भाजप नेता म्हणतो, ‘हनुमान चिनी आहे.’ चिनी म्हणजे हनुमान बनावट आहे का ?, बोगस आहे का ? कारण चिनी वस्तू बोगस असतात, तर दुसरा एक महाभाग म्हणतो ‘हनुमान मुसलमान आहे.’ हनुमानाची जात ठरवणारी ही मंडळी उद्या अयोध्येतील हनुमान गडीही मशीद आहे; म्हणून तोडण्यास मागे पुढे पहाणार नाहीत. यांना रामायणावर बोलण्याचा अधिकार नाही.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात