हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होण्याकरता साधनेचे बळ आवश्यक ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
लोटे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज स्थापन केले नाही, तर जगदंबेची उपासना आणि संतांच्या आशीर्वादाच्या बळावरच ५ पातशाह्यांना नमवून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्याला ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होण्याकरता साधनेचे बळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. हेमंत चाळके यांनी केले.
अजगणी, खेड येथील ‘त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने श्रीदत्त मंदिरात दत्तजयंती निमित्ताने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती ग्रामसभेत ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापना ’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी मनुष्य जीवनात साधनेची आवश्यकता आणि श्री दत्तगुरूंच्या उपासनेचे महत्त्व त्यांनी उपस्थितांसमोर विशद केले.
सद्गुरु दीपकनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार अजगणी येथे श्री दत्तमंदिराची निर्मिती झाली. याविषयी गावप्रमुख श्री. विठ्ठल नायनाक यांनी गुरुपरंपरा आणि सांप्रदायिक भक्ती महिमा विशद केला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र सखाराम बुरटे, श्री चंद्रकांत गोसावी यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री विष्णु साळुंके, सनातन संस्थेचे श्री ज्ञानदेव पाटील, सौ. विमल पाटील यांच्यासह १३० धर्मप्रेमी उपस्थित होते.