स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताहाती असणार्यांनी हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरण राबवले ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
खेड : या देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्यावर पाश्चात्त्य शिक्षणाचे संस्कार असल्याने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांविषयी त्यांच्या संवेदना बोथट होत्या. सोरटि सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांना ‘देशाचा राष्ट्रपती या नात्याने एका धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होणे उचित होणार नाही. त्यामुळे देशाची धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा निर्माण होण्यास अडथळे येतील’, असे मत व्यक्त करून नेहरू यांनी डॉ. प्रसाद यांना उपस्थित रहाण्यास मज्जाव केला. देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीलाही स्वत:च्या धार्मिक श्रद्धांसाठी संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताहाती असणार्यांनी हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरण राबवले, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी केले
आयनी, ता. खेड येथे श्री केदारनाथ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ‘सत्ताधार्यांनी घेतलेले हिंदुविरोधी निर्णय आणि त्याचे झालेले दुष्परिणाम’ याविषयी उपस्थित धर्मप्रेमींना अवगत करतांना डॉ. चाळके बोलत होते. या सभेचा लाभ ५४ धर्मप्रेमींनी घेतला.
या सभेला आयनी गावचे सरपंच शांताराम कविस्कर, पोलीस पाटील सुनील भालेकर, ह.भ.प. शंकर महाराज लंबाडे, ह.भ.प. विठ्ठल महाराज मनवळ, अनंत द. दळवी, श्रीधर रामचंद्र बिरवटकर, संदीप शिंदे, दिनेश शिंदे, अवधूत चितळे, बचत गटप्रमुख सौ. माधवी अरविंद वीर आणि सौ. राजश्री राजाराम माळी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.या सभेला संदीप भुवड यांनी त्यांची ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य देऊन सहकार्य केले. या वेळी सनातनचेे ग्रंथ आणि उत्पादन कक्ष उभारण्यात आला होता. या सभेचे सूत्रसंचालन श्री. दत्ताराम घाग यांनी केले.