खेड : भक्ती निर्विघ्नपणे करण्यासाठी समाजात धार्मिक अधिष्ठान पाहिजे. धर्म संकटात असतांना ईश्वराची उपासना करणे, सर्वसामान्य माणसाला कठीण होऊन बसते. आज हिंदु धर्म रक्षणासाठी कृतीशील होण्याची आवश्यकता आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म रक्षण करण्याचे कार्य करत आहे. त्यांच्यावर अनेक संकटे येत आहेत; परंतु कितीही संकटे आली, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्र स्थापन करणारच याची खात्री वाटते, असे मनोगत खेड तालुका वारकरी आणि भाविक सांप्रदाय मंडळाचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी व्यक्त केले.
मंडळाच्या वतीने तालुक्यातील भरणे येथील मठामध्ये प्रतिवर्षी संपन्न होणार्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीला ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ हा विषय मांडण्याची संधी दिली होती. या वेळी ह.भ.प. येसरे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ आठवले यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.
देव, देश आणि धर्म रक्षणासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात स्वीकारलेली लोकशाही शासनपद्धती आणि घटनादुरुस्ती द्वारे बहुसंख्याक हिंदूंवर लादलेली धर्मनिरपेक्षता यांमुळे हिंदु धर्मियांचे धार्मिक अस्तित्व धोक्यात आले आहे. याकरता देव, देश आणि धर्म रक्षणासाठी हिंदु राष्ट्र स्थापन होणे, हाच उपाय असून त्याकरता संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. हेमंत चाळके यांनी केले. या वेळी मंदिर सरकारीकरण झालेले पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर, तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध देवस्थानांमध्ये शासन नियुक्त समितीद्वारे केला जाणार भ्रष्ट कारभार आणि तेथील सात्त्विकता नष्ट होईल असे घेतले जाणारे निर्णय, याविषयी उपस्थित वारकरी यांना डॉ. चाळके यांनी अवगत केले. या कार्यक्रमाअगोदर ह.भ.प. प्रकाश महाराज पानकर यांचे ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन झाले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव यांच्या हस्ते डॉ. हेमंत चाळके यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी चिपळूण येथे होणार्या हिंदु राष्ट्र -जागृती सभेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार उपस्थित वारकर्यांनी केला.