Menu Close

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राष्ट्रीय स्तरावरील ‘पंचम अधिवक्ता शिबिरा’ला प्रारंभ

अधिवक्त्यांनी ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना म्हणून वकिली केली पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

डावीकडून अधिवक्ता अमृतेश एन्.पी.,अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

रामनाथी, गोवा : हिंदु धर्मविरोधी गोष्टीत केवळ याचिका प्रविष्ट न करता एकूणच हिंदुत्वाचे कार्य कसे पुढे जाईल, यासाठीचे अधिवक्ता म्हणून आपले प्रयत्न पाहिजेत. सध्या समाजात हिंदुविरोधी प्रवाह निर्माण झाला आहे. हा प्रवाह पालटणारा हिंदु प्रवाह आपल्याला बनायचे आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हे सर्व कार्य करत असतांना मनाला येणारी मरगळ झटकण्यासाठी साधना कशी आवश्यक आहे, हेही अनुभवले पाहिजे. यासाठी अधिवक्त्यांनी ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना म्हणून वकिली केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २३ डिसेंबर या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषद आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘पंचम अधिवक्ता अधिवेशना’ला आरंभ झाला. शंखनाद आणि वेदमंत्रपठण झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून शिबिराचा भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या वेळी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करतांना अधिवक्ता इचलकरंजीकर बोलत होते. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांतील ४० हून अधिक अधिवक्ते सहभागी झाले आहेत. या अधिवेशनाची सांगता २५ डिसेंबरला होणार आहे.

या वेळी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मूलभूत संकल्पना’, तसेच ‘हिंदु राष्ट्रात राज्यव्यवस्था कशी असणार’ आदींविषयीची माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

न्यायव्यवस्थेतील अनेक अयोग्य गोष्टींमध्ये पालट करण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद कार्यरत आहे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

‘न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या दृष्टीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे विचार आणि त्या दिशेने प्रयत्न’ याविषयावर बोलतांना अधिवक्ता नीलेश सांगोलकर म्हणाले, ‘‘मोझेसला मिळालेल्या १० सूचना २ दगडांवर लिहिल्या गेल्या आणि त्या २ दगडांचे प्रतीक म्हणजे न्यायव्यवस्थेतील अधिवक्त्यांच्या पोशाखात असलेला ‘बँड’ (गळ्यात लावली जाणारी पट्टी) होय. हा बँड आणि अशा अनेक अयोग्य गोष्टींमध्ये पालट करण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद कार्यरत आहे.’’

अपेक्षांना तिलांजली देत सेवा म्हणून वकिली केल्यास ईश्‍वर आपली इच्छा पूर्ण करतो ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी अधिवक्ता म्हणून वकिली करतांना आलेले अनुभव कथन केले. ते म्हणाले, ‘‘हिंदु विधीज्ञ परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर ‘अधिवक्ता म्हणून वकिली करत असतांना कसा दृष्टीकोन ठेवावा ?, केवळ वैयक्तिक स्वार्थ न ठेवता राष्ट्र अन् धर्म रक्षणाच्या कार्यात साधना म्हणून कसे सहभागी होऊ शकतो’, हे समजले. त्यामुळे साधना म्हणून काम करत असतांना अपेक्षांना तिलांजली दिली, कोणतीही अभिलाषा ठेवली नाही, तर ईश्‍वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, याचा अनुभव घेता आला. साधना म्हणून वकिली करतांना लोभापायी चुकीच्या गोष्टी न करण्याविषयी ठाम भूमिका घेण्याचे धैर्य निर्माण होते. त्यामुळे अनेक आमिषांना बळी न पडता तत्त्वनिष्ठपणे या प्रसंगांना सामोरे जाता आले. असे असले, तरी ईश्‍वराने इच्छा पूर्ण केल्याची अनुभूती घेता आली.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले याचा संदेश

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘पंचम राष्ट्रीय अधिवक्ता शिबिरा’त भारतभूमीचे सुपुत्र एकत्रित होत आहेत. ही सर्वांसाठी आनंददायी घटना आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी शारीरिक आणि वैचारिक क्षमतेसह आध्यात्मिक बळही असणे आवश्यक असते. केवळ साधना करूनच स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवता येते.

१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून सहभागी व्हा !

‘रात्री अंधार असतांना आपण सूर्य लवकर उगवावा; म्हणून कितीही प्रयत्न केले, तरी सूर्य लवकर उगवत नाही. तो ठरलेल्या वेळीच उगवतो. याला ‘कालमाहात्म्य’ म्हणतात. या कालमाहात्म्यानुसार आपण काही केले नाही, तरी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.

असे आहे, तर आपण त्यासाठी प्रयत्न कशाला करायचे ?’, असे कोणाला वाटू शकेल. त्याचे उत्तर आहे, ‘त्यामुळे आपली साधना होऊन आपण जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो.’ श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला. तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला खालून काठ्या लावल्या. आपले कार्य तेवढेच आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे !

२. साधना केल्यानंतरच भगवंत आपल्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करवून घेईल !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मी काहीतरी करणार’, असा विचार चुकीचा असतो; कारण ती स्वेच्छा असते. या स्वेच्छेत अहंभाव असतो. जेथे आपण आपले प्रारब्ध पालटू शकत नाही, जेथे आपल्या स्वेच्छेने झाडाचे पानही हलत नाही, तेथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य आपण करू शकू का ? ते कार्य केवळ भगवंतच करू शकतो. आपण कार्याच्या जोडीला साधना केली, देवाप्रती भाव निर्माण केला, तर पावलापावलाला भगवंत मार्गदर्शन करून आणि आवश्यक तेवढी शक्ती देऊन आपल्याकडून कार्य करवून घेतो.

धर्मबंधूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील हे साधनेचे महत्त्व लक्षात घ्या आणि स्वतः साधना करून भगवंताची कृपा संपादन करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *