माता ज्योतिर्मयी यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीचे संपूर्ण सहकार्य राहील ! – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
भाग्यनगर : आंध्रप्रदेश येथील प्रसिद्ध कीर्तनकार माता कोंडवीटी ज्योतिर्मयी यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी दिले. श्री. चेतन यांनी माता ज्योतिर्मयी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी माता ज्योतिर्मयी यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांविषयी चर्चा केली, तसेच त्यांना वर्ष २०१९ चे तेलुगु भाषेतील सनातन पंचांग भेट दिले.
माता ज्योतिर्मयी यांनी ‘हैदव संग्रामम् दीक्षा’ नावाने एक आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामध्ये सर्व हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन माता ज्योतिर्मयी यांनी केले. तिरुमला तिरुपती मंडळात कोणत्याही राजकीय नेते किंवा चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यांना स्थान असू नये, तिरुमला देवस्थान आणि सरकार यांच्या अधीन असलेल्या सर्व मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या स्वाधीन करावे, ‘तिरुमला तिरुपातु पालक मंडली’ हे नाव पालटून ‘तिरुमला तिरुपति देवस्थान धार्मिक सेवा समिती’ करावे, तिरुमती शहराच्या ३५ किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये मद्याची दुकाने असू नये, याकरता शासकीय आदेश काढण्यात यावा, अशी मागणी माता ज्योतिर्मयी यांनी एका निवेदनाद्वारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडेे केली होती; मात्र या संदर्भात शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ‘हैदव संग्रामम् दीक्षा’ नावाने एक आंदोलन चालू करण्यात आलेे, असे माता ज्योतिर्मयी यांनी सांगितले.